महानगराच्या दिशेने वाटचाल होत असलेल्या पुण्यात कायदा- सुव्यवस्था, नागरी आणि पायाभूत सुविधांपेक्षा वाहतुकीच्या समस्येचे ग्रहण लागले आहे. कारण थोडासा पाऊस झाला, तरी पुण्यात ७०-८० ठिकाणी पाणी साचते, झाडाच्या फांद्या पडतात, मोठे खड्डे निर्माण होतात. त्यामुळे होणाऱ्या अपघातांतून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असले, तरी, त्यांची गती ही वाढणाऱ्या वाहतुकीपुढे मंदावली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे
पुणे शहरातील वाहनांची संख्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नोंदीनुसार ५० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. या शहराची लोकसंख्या ६० लाखांवर पोचली आहे. पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातून रोज होणारी वाहतूक लक्षात घेता, पुण्याच्या रस्त्यांवर दररोज ७० लाखांपेक्षा नागरिकांचा वावर आहे. लोकसंख्या आणि वाहनांची संख्या बघितली तर, हे प्रमाण सारखे होत चालले आहे. या वाहनांसाठी पुरेसे रस्ते आहेत का, हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरीत आहे. सध्या पुणे शहरातील रस्त्यांची लांबी सुमारे दोन हजार किलोमीटर आहे.
गेल्या पाच वर्षांत त्यात अवघी ४०० किलोमीटरने वाढ झाली आहे. रस्त्यांची लांबी वाढली तरी रुंदी वाढलेली नाही. उलट सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या मध्य पुण्यात तर, नियोजित रस्ता रुंदी रद्द करण्याची किमया लोकप्रतिनिधींनी केली आहे. दरवर्षी या शहरात सुमारे तीन लाख नव्या वाहनांची भर पडते. म्हणजेच वाहनांना सध्या रस्ते अपुरे पडत आहेत. शहराचा विस्तार ४८७ चौरस किलोमीटर झाला आहे. शहरात गेल्या पाच वर्षांत ३४ गावे नव्याने समाविष्ट झाली. मात्र, त्या गावांतील रस्त्यांच्या निर्मितीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीच्या बाहेर ३० किलोमीटरपर्यंत वेगाने नागरीकरण होत आहे. सक्षम सार्वजनिक वाहतूक नसल्यामुळे या नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागतो.
उपनगरे, समाविष्ट गावांतील ७८३ किलोमीटरचे रस्ते अद्याप व्हायचे आहे. म्हणजेच वाढत्या वाहन संख्येला सामावून घेण्याची रस्त्यांची क्षमता कमी पडत आहे. परिणामी वाहनांची संख्या, अपघात, वाहतूक कोंडी, प्रदूषण वाढणार. त्यातून हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार. मग या प्रश्नाला उत्तर म्हणजेच सक्षम सार्वजनिक वाहतूक. मात्र, तिची अवस्था फारशी चांगली आहे, असे म्हणता येणार नाही.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) ही शहराची प्रमुख बस सेवा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या सेवेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहराच्या वाढत्या गरजांनुसार बसगाड्यांची संख्या अत्यंत अपुरी आहे. बस वेळेवर येत नाहीत, उपनगरांतील अनेक मार्गांवर फारशा बस नाहीत, तर काही बस तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यावरच बंद पडतात. परिणामी नागरिकांचा विश्वास या सेवेवर राहिलेला नाही. पीएमपी ही शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात वाहतूक सेवा देते.
या तिन्ही विभागांतील लोकसंख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात किमान तीन हजार बसची आवश्यकता आहे. पण, पीएमपीच्या ताफ्यात रस्त्यावर धावणाऱ्या बसची संख्या फक्त १६५० आहे. त्यातही ब्रेकडाऊनमुळे किमान ३०-३५ बस दररोज नादुरुस्त होतात. किफायतशीर दरात बस प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका पीएमपीला अनुदान देते. त्यामुळे माफक दरात पीएमपी प्रवाशांना सेवा पुरवित होती. परंतु, आता त्या दरांतही जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक कुचंबना होत आहे. परिणामी हा प्रवासी मेट्रो किंवा खासगी वाहन आदी पर्यायांकडे वळाला आहे.
शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही महापालिकांनी बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) उभारली. पहिल्या टप्प्यात स्वारगेट- कात्रज आणि हडपसर-स्वारगेट रस्त्यावर बीआरटी सुरू झाली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच विश्रांतवाडी, नगर रस्ता; तसेच पिंपरी-चिंचवड औंध-रावेत, किवळे फाटा येथे बीआरटी कार्यान्वित झाली. परंतु, तेथेही बीआरटीचा विस्तार झाला नाही. दोन्ही शहरांत २५० किलोमीटरचा बीआरटी मार्ग उभारण्याचे नियोजन होते. परंतु, मेट्रोसाठी प्रशासनाने पायघड्या घातल्या. त्यामुळे बीआरटीकडे दुर्लक्ष झाले. हडपसर आणि नगर रस्त्यावर तर, उभारलेली बीआरटी महापालिकेने काढून टाकली आहे.
मेट्रो आल्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र पिंपरी-स्वारगेट आणि वनाज-रामवाडी या मार्गांवर २०२२ पासून टप्प्याटप्प्याने सुरू झालेली ही सेवा पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सर्व भागांत अद्याप पोचलेली नाही. मेट्रोतून दररोज सरासरी एक लाख ७१ हजार प्रवास करतात. मात्र, उपनगरांत राहणारे लाखो प्रवासी अद्याप मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी अन्य पर्यायी वाहतूक व्यवस्था (उदा - फिडर बससेवा) सक्षम नाही. त्यामुळे मेट्रोचा पुरेसा लाभ घेतला जात नाही
शहरात सार्वजनिक वाहतूक अपुरी असल्यामुळे नागरिक दुचाकी व चारचाकी खरेदीकडे वळले आहेत. पुणे देशातील सर्वाधिक दुचाकी वाहन असलेले शहर आहे. त्यासाठी शहरातील रस्ते अपुरे ठरत आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण होत नाही आणि नवीन रस्त्यांचे जाळे अपुरे असून, वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे. यामुळे वेळ व इंधनही वाया जाते. तसेच, होणाऱ्या विलंबामुळे कामाच्या तासांचाही अपव्यय होतो. कोंडीमुळे नागरिकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.
शहर आणि उपनगरांतील अनेक मुख्य रस्ते आणि गल्लीबोळांत सिमेंटचे आणि डांबरी रस्ते आहेत. विशेषतः उपनगरांत सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे. परंतु, केबल, एमएनएजीएल, महावितरण आणि महापालिका यांच्यात पुरेसा समन्वय नसल्यामुळे नवे किंवा देखभाल-दुरुस्ती झालेले रस्तेही खोदले जातात. त्याला सिमेंटचेही रस्ते अपवाद नाहीत. खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी महापालिका ठेकेदारावर टाकते. परंतु, त्यांच्याकडून योग्य दर्जाचे काम होईल का, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होते. परिणामी रस्त्यांची अवस्था खराब होते. त्यातून खड्डे, असमतल रस्ते तयार होतात. त्यातून अपघात होतात.
जागतिक दर्जाच्या शहरांमध्ये बस, मेट्रो, सायकल पथ, फीडर सेवा आणि पादचारी मार्ग एकत्रितपणे वापरले जातात. पुण्यात मात्र याबाबतीत समन्वयाचा अभाव आहे. महापालिकेने ११५ किलोमीटरचे सायकल ट्रॅक तयार केले. परंतु, त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पुण्यात आता नवे सायकल ट्रॅक होणार का, याचेही उत्तर अनुत्तरीत आहे. शहरात अनेक ठिकाणी पदपथ झाले आहेत. परंतु, त्यावरही अतिक्रमणे झाली आहेत. परिणामी पादचाऱ्यांचे अपघात वाढत आहेत
पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातूनही दररोज शहरात वाहतूक होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दररोज किमान ७२ लाख वाहनांची वाहतूक होते. मात्र, त्यांचे नियमन करण्यासाठी शहर पोलिसांकडे फक्त एक हजार वाहतूक पोलिस आहेत. शहरात सिग्नल असलेले चौक सुमारे ३२५ असून नसलेले चौक सुमारे १२५६ आहेत. वाहतूक पोलिसांची संख्याही अपुरी असल्यामुळे नियमनाकडे दुर्लक्ष होते. तसेच सीसीटीव्ही, सिग्नल यांचेही प्रमाण कमी आहे. वाहतुकीबाबत पुणे आणि मुंबई या शहरांत रस्त्यांच्या लांबीचे साम्य आहे.
या दोन्ही शहरांत रस्त्यांची लांबी सारखी म्हणजेच दोन हजार ५०० किलोमीटर आहे. मात्र, मुंबईत वाहतूक पोलिसांची संख्या तीन हजार ५०० आहे. म्हणजेच पुण्यापेक्षा अडीचपट जास्त वाहतूक पोलिस मुंबईत आहेत. वाहनांची संख्या, रस्त्यांची लांबी, चौकांची संख्या लक्षात घेता शहरात तातडीने वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. शहरातील ३३ प्रमुख रस्त्यांवर वाहतूक सुधारणेचा कार्यक्रम पोलिसांनी हाती घेतला आहे. त्यासाठी दोन्ही महापालिकांची मदत घेण्यात येत आहे. परंतु, त्यातही अनेक अडथळ्यांचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
पुणे शहराचे क्षेत्रफळ - ४८७ चौरस किलोमीटर
पुण्यातील रस्त्यांची लांबी - २५०० किलोमीटर ; उपनगरांत विकसित होणे अपेक्षित असलेले रस्ते ७८२ किलोमीटर l
महापालिकेकडून रस्त्यांवर दरवर्षी होणारा खर्च - १७०० कोटी रुपये
पीएमपीच्या रस्त्यावर धावणाऱ्या रोजच्या बस - १६५० ; सरासरी प्रवासी संख्या ११ ते १२ लाख
विमानाची रोजची वाहतूक - २०२ ; प्रवासी संख्या ३५ हजार ; ३५ शहरांशी संपर्क ; बॅंकॉक, दुबई, सिंगापूरसाठी विमान सेवा
रेल्वेची रोजची वाहतूक - १६० गाड्या ; १ लाख ६० हजार प्रवासी l
पुणे - लोणावळा लोकल ; दररोजच्या फेऱ्या ४२ ; प्रवासी संख्या ६० हजार ; ६३ किलोमीटर अंतर
एसटी बस - स्वारगेट, शिवाजीनगर, वाकडेवाडी स्थानकातून सुटणाऱ्या बस - ७३०; प्रवासी संख्या एक लाख ५० हजार lमेट्रो - अंतर कार्यान्वित ३१ किलोमीटर ; रोजची सरासरी प्रवासी संख्या १ लाख ६० हजार
रिक्षा - एक लाख सात हजार - प्रवासी वाहतूक सुमारे सहा लाख
कॅब - ६० हजार - प्रवासी वाहतूक - सुमारे चार लाख
शहरात २०२३ मध्ये ९४१ प्राणांतिक अपघातात ३५१ नागरिकांचे प्राण गेले. २०२४ मध्ये अपघाताचे प्रमाण ९९३ वर पोहोचले आणि ३४५ जण मृत्युमुखी पडले. अपघातांची ही संख्या वाढतीच आहे.
१) पीएमपीच्या बससेवेत अधिक गुंतवणूक करून नवीन आणि इलेक्ट्रिक बसेस खरेदी कराव्यात
२) मेट्रो नेटवर्कचा विस्तार लवकरात लवकर उपनगरांपर्यंत करणे आवश्यक आहे
३) फीडर बस, सायकल पथ, पादचारी मार्ग यामध्ये सुधारणा करून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभी करणे.
४) वाहतूक नियोजनात तज्ज्ञ आणि नागरी संस्थांचा समावेश करणे
५) वाहतूक नियमांचे कठोर पालन आणि जनजागृती मोहीम राबवणे
६) खासगी वाहनांच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी पार्किंग धोरण,
७) पादचारी धोरणांची अंमलबजावणी करणे
८) शहरी नियोजनात वाहतुकीचा विचार प्राधान्याने घेणे
९) वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.