Food Safety Rules News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई, खाद्यतेल, मसाले आणि ड्रायफ्रूटमध्ये भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापाऱ्यांना थेट पुण्यातून इशारा दिला आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी राज्यभर तपासणी आणि कारवाईची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आलेल्या मुंढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना FDAच्या कारवाईची माहिती दिली. मसाले आणि खाद्यतेलाच्या बाबतीत राज्यभरात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मसाल्यांच्या बाबतीत एक हजाराहून अधिक ठिकाणी, तर खाद्यतेलाच्या बाबतीतही एक हजाराहून अधिक ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. या कारवाईत खाद्यतेलाचा सुमारे २८ हजार क्विंटल, तर मसाल्यांचा १८ ते २० हजार क्विंटल साठा जप्त करण्यात आल्याचे मुंढे यांनी सांगितले.
यंदा 'FDA'ने केवळ दिवाळीपुरती मर्यादित मोहीम न राबवता वर्षभरातील सर्व सणांसाठी स्वतंत्र स्थायी आदेश काढले आहेत. सणाच्या २१ दिवस आधीपासून आणि सणानंतर ३० दिवसांपर्यंत चार टप्प्यांत तपासणी केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उत्पादक, गोदामे, डीलर्स आणि वितरकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. हा टप्पा नुकताच पूर्ण झाला असून, भेसळयुक्त किंवा निकृष्ट कच्चा माल बाजारात येऊ नये, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आता दुसऱ्या टप्प्यात मिठाई आणि दिवाळीच्या फराळासाठी तयार होणाऱ्या पदार्थांवर कारवाई सुरू झाली आहे. लाडू, जिलेबी आणि इतर मिठाईच्या उत्पादनांची तपासणी केली जात आहे. मोतीचूर लाडूंमध्ये यंदा रंग कमी दिसत असल्याबाबत नागरिकांनी विचारणा केल्याचा उल्लेख करत मुंढे म्हणाले, खाद्यपदार्थांमध्ये रंगाचा वापर निर्धारित मर्यादेतच असणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमांचे पालन करूनच मिठाईची विक्री करावी.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा तपासण्यांची आणि कारवाईची संख्या अनेक पटींनी वाढवण्यात आली आहे. राज्यभरातील कारवायांची सविस्तर माहिती सोमवारपासून समोर येईल, असेही त्यांनी सांगितले.
दिवाळीच्या खरेदीत मोठ्या प्रमाणावर विक्री होणाऱ्या ड्रायफ्रूटच्या साठवणुकीवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईतील एका गोदामावर मोठी कारवाई करण्यात आली. या गोदामातून मुंबई आणि पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर मालाचा पुरवठा होत होता. मात्र, तपासणीमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळल्याने संबंधित गोदाम सील करून परवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली असून, पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, मसाले तसेच ड्रायफ्रूट या सर्वच उत्पादनांची तपासणी आणि नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादक आणि विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्यापारी वर्गाने अन्न सुरक्षा नियम आणि 'FDA'ने वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करावे. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे ही उत्पादक आणि विक्रेत्यांची जबाबदारी आहे. नियमांचे पालन केल्यास व्यवसायही व्यवस्थित चालेल आणि नागरिकांचे आरोग्यही सुरक्षित राहील, असे आवाहन मुंढे यांनी केले.
दरम्यान, अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत किंवा भेसळीबाबत नागरिकांना संशय असल्यास त्यांनी complaints.mahafda.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारींवर प्रशासनाकडून तातडीने कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दिवाळीच्या तोंडावर 'FDA'ने तपासणीचा वेग वाढवल्याने मिठाई विक्रेते, खाद्यतेल व्यापारी, ड्रायफ्रूट विक्रेते आणि अन्नपदार्थ उत्पादकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.