Pune Flood, PMC Sarkarnama
पुणे

Pune PMC : पुण्याचे 'पाणी' तापले, नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर; पहिलीच सभा गाजली...

PMC General Body Meeting : पुण्यातील पाणीटंचाई, दूषित पाणी आणि अनियमित पुरवठ्यावर महापालिकेच्या सभेत नगरसेवक आक्रमक झाले. कोंढवा, हडपसर, वानवडी परिसरातील समस्या तातडीने सोडविण्याचे प्रशासनास आदेश देण्यात आले.

सरकारनामा ब्यूरो

Pune Pune Water Crisis : पुणे शहराच्या काही भागांमध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या पाण्याच्या समस्यांच्या जोरदार पाढा वाचत नगरसेवकांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये प्रशासनास धारेवर धरले. 10-15 दिवसांपासून अपुरा तसेच कमी दाबाने येणारे पाणी, अनेक भागांमध्ये होणारा दूषित पाण्याचा पुरवठा आणि अनियमित पाणी पुरवठा, अशा प्रकारे तक्रारी मांडत संताप व्यक्त केला. जुन्या नगरसेवकांबरोबरच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांनीही आपल्या भागातील प्रश्‍नावर आवाज उठविला.

शहराच्या वेगवेगळ्या भागात जानेवारीपासूनच पाणी समस्या सुरु झाली आहे. त्याचे पडसाद बुधवारी झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. कोंढवा परिसरामध्ये 10 ते 15 दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी केली. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे दररोज पाठपुरावा करूनही प्रशासन दखल घेत नाही. रमजानचा महिना व शिवजयंतीच्या काळातही नागरिकांना पाणी मिळत नसल्याबद्दल पठाण यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

त्यापाठोपाठ नगरसेविका वैशाली बनकर यांनी सासवड रोड परिसरामध्ये जलवाहिनीमध्ये सांडपाणी जात आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे, प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोप बनकर यांनी केला. नगरसेविका अश्‍विनी लांडगे, नगरसेवक विशाल मलके यांनी येरवडा परिसरातील दूषित पाण्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे सांगितले.

दरम्यान, ताडीवाला रोड परिसरात पहाटे 2 ते 3 या वेळेत पाणी सुटते, कष्टकऱ्यांनी पाणी भरायचे केव्हा ? असा सुमय्या नदाफ यांनी प्रश्‍न उपस्थित केला. तसेच पाणी सोडण्याच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली. दरम्यान, नगरसेवक प्रशांत जगताप यांनीही वानवडी, कोंढवा परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगून हा पाणी पुरवठा पुर्ववत करण्याची मागणी केली.

नगरसेवकांकडून पाणी प्रश्‍नावर आवाज उठविला जात असतानाही प्रशासनाकडून खुलासा होत नसल्यामुळे नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी पाणी समस्येवर खुलासा केला. " काही परिसरामध्ये जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम केले जात असल्यामुळे तसेच काही ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकली जात आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करताना विस्कळीतपणा आला आहे.

ड्रेनेज विभागाकडून वर्गीकरणाद्वारे काही निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यातून कोंढवा, महमदवाडी, हडपसर व अन्य परिसरातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी तातडीने काम केले जाईल, काही ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या बांधल्या आहे, मात्र जलवाहिन्या टाकण्याची कामे सुरु आहेत. दूषित पाणी येत असलेल्या ठिकाणी भेटी देऊन हा प्रश्‍न तातडीने सोडविला जाईल, असे जगताप यांनी स्पष्टीकरण दिले. दरम्यान, महापौर मंजूषा नागपुरे यांनी नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेत क्षेत्रीय कार्यालय स्तरावर बैठका घेऊन पाणी प्रश्‍न तातडीने सोडविण्याचे आदेश प्रशासनास दिले.

सांडपाणी वाहिन्यांच्या कामांवरूनही प्रशासनावर टिका

जनता वसाहतीमध्ये सांडपाणी वाहिन्यांची कमतरता असून त्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येऊन नागरिकांना चालणे मुश्कील होत आहे. जनता वसाहत व सिंहगड रस्ता परिसरात जाण्यासाठी नागरिकांकडून कॅनॉल रस्त्याचा वापर केला जातो. या प्रश्‍नाकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेविका प्रिया गदादे, नगरसेवक सुरज लोखंडे यांनी केला. कोंढव्यामध्येही सांडपाणी वाहिन्यांची समस्या गंभीर आहे, वाहिन्या जुन्या झाल्या असून त्या तातडीने बदलण्याची गरज असल्याची मागणी नगरसेवकांनी केली. त्यावर मलनिःसारण विभागाचे जगदीश खानोरे यांनी सांडपाणी वाहिन्यांसंबंधी तक्रारी असणाऱ्या ठिकाणी पाहणी करून हा प्रश्‍न सोडविला जाईल, असे सभेत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT