Pune News : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 6 तालुक्यांमध्ये आजी-माजी आमदार आमने-सामने ठाकले आहेत. त्यामुळे जुन्नर, खेड, मावळ, भोर, पुरंदर आणि दौंड या विधानसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीच्या लढती होणार आहेत. शिरूर आणि इंदापुरात आजी-माजी आमदारांनी आपसात जुळवून घेतल्याने त्यांच्या समर्थकांची मात्र दैना झाली झाली असून, हे कार्यकर्ते वेगळा निर्णय घेऊन निवडणुकीचा निकाल बदलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 27 जानेवारी हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतर सर्व ठिकाणचे निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. जुन्नर तालुक्यात आमदार शरद सोनवणे यांच्याबरोबर शिवसेना, माजी आमदार अतुल बेनके यांच्या उमेदवारांमध्ये लढत होत आहे. तर आंबेगाव तालुक्यात ठाकरेंची सेना आणि शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांनी एकत्र येऊन आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या तालुक्यात शरद पवारांचा पक्ष तुतारी चिन्ह घेऊन आणि आणि अजित पवार यांचा पक्ष घड्याळ घेऊन आमने-सामने उभे आहेत.
खेड तालुक्यात ठाकरेंच्या सेनेचे आमदार बाबाजी काळे आणि माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. याशिवाय शिवसेनेचे अतुल देशमुख यांनीही तालुक्यात सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. मावळमध्ये यावेळी आमदार सुनील शेळके यांना निवडणूक अवघड झाली अडूस भाजपकडून त्यांची कोंडी करण्यात आली आहे.
मुळशी, वेल्हे आणि भोर या तालुक्यांत ठाकरेंच्या सेनेने तुल्यबळ उमेदवार उभे केले आहेत. अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्यापुढे या वेळी माजी आमदार संग्राम थोपटे यांनी तोडीसतोड उमेदवार दिले आहेत. शिंदे गटाबरोबरच मुळशीमध्ये तुतारी आणि घड्याळ यांच्यातील आघाडीत बिघडी झाली आहे.
पुरंदर तालुक्यात शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे, भाजपचे माजी आमदार संजय जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे. दौंड तालुक्यात मात्र विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात थेट दुरंगी सामना पाहायला मिळत असून, काही ठिकाणी शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने समीकरणे बदलताना दिसत आहेत.
बारामती तालुक्यात अजित पवार यांनी भाजपसोबत आघाडी साधण्याचा प्रयत्न केला असला, तरी सहाही जागांवर अपक्ष तसेच इतर पक्षांचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. अनेक ठिकाणी भाजपकडून या उमेदवारांना पाठिंबा मिळत असल्यामुळे लढती अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. परिणामी, तालुकास्तरावरही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेनेचे उमेदवार एकाच रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची ठरणार आहे.
शिरूर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले आजी-माजी आमदार माउली कटके आणि अशोक पवार हे आता एकत्र आले आहेत. अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. मात्र, मांडवगण फराटा गटात आमदार माउली कटके यांना आतापर्यंत जिद्दीने पाठिंबा देणारे दादा पाटील फराटे यांना आता अपक्ष उमेदवारांचे पॅनल उभे करून निवडणुकीत उतरावे लागले आहे.
दुसरीकडे, इंदापूरमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकमेकांच्या सोबत आले आहेत. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता ही राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभी आहे. तरीही, बावडा गटात भरणे यांच्या पाठीशी अनेक निवडणुकांमध्ये ठामपणे उभे राहिलेला गट यावेळी निवडणुकीतून पूर्णपणे बाहेर फेकला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.