Pune News : महापालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीच्या आणाभाका घेऊन एकमेकांना आरसा दाखवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यासाठी भाजपने मास्टर प्लॅन आखला असून अजितदादांना पुणे जिल्ह्यात घेरण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरू केली असल्याचे सांगितले जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपवर तीव्र हल्ले चढवले होते. पुण्यातील त्रिकूट तर पिंपरी-चिंचवडमध्ये आमदार महेश लांडगे यांच्यावर जोरदार टीका करून पवार यांनी निवडणुकीला रंगत आणली होती. फडणवीस यांनीही पवारांचे नाव न घेता "त्यांनी आरसा पाहावा" अशी टीका केली होती.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आणि त्यांचे पानिपत झाले. तरीही, पवार यांनी केलेल्या भाजपविरोधी टीकेच्या बदल्यात सव्याज परतावा देण्यासाठी भाजप आता जिल्हा परिषदेची संधी साधत आहे. जिल्हा परिषदेच्या कारभाराची गोपनीय चौकशी सुरू करण्यात आली असून, त्याचा उपयोग प्रचारादरम्यान पवारांना अडचणीत आणण्यासाठी होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युती करण्याच्या हालचाली केली मात्र त्या व्यर्थ ठरल्या. तरी देखील जिल्हा परिषदेचे 73 सदस्य असून, या सर्व ठिकाणी सक्षम उमेदवार भाजपने दिले आहेत. यामाध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान निर्माण केले आहे.
दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित लढण्याचे निश्चित केले असून बहुतांश ठिकाणी एकत्रित निवडणूक लढणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यात बैठका झडल्या असून, या दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे भाजपला रोखण्यासाठी तयारीत आहेत.
पुणे जिल्ह्यातील दोन्ही खासदार शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आहेत, तर दहापैकी आठ आमदार दादांच्या 'राष्ट्रवादी'चे निवडून आले आहेत. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे, कोल्हे यांच्यासह 10 आमदारांच्या मदतीने पवार यांच्याकडून भाजपला रोखण्यासाठीची पूर्ण तयारी केली आहे.
भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आणि पुणे जिल्ह्यातील अजित पवारांच्या ताकदीला शह देण्यासाठी माजी आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांचा भाजप प्रवेश करून घेतला आहे. याशिवाय इंदापूर येथील नाराज प्रदीप गारटकरही भाजपवासी झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.