MLA Rahul Kul addressing party workers during a BJP induction programme in Kesnand, Pune district, as several NCP leaders and supporters formally joined the party. Sarkarnama
पुणे

Rahul Kul : राहुल कुल यांनीही साधलं टायमिंग , ZP निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना 'दे धक्का'; स्वत:बाबत जुळून आलेला 'योगायोग'ही सांगितला

Pune ZP Election : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर केसनंदमध्ये राहुल कुल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचे रणधुमाळी सध्या सुरू आहे. या रणधुमाळी मध्ये पक्षांतराचे वारे देखील जोरदार वाहताना पाहायला मिळत आहेत. राज्यभरात भाजपाचा सुरू असलेला झंजावात रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यात चांगलीच कंबर कसली आहे.असं असलं तरी भाजपकडून अजित पवार यांना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हवेली तालुक्यातील केसनंद येथे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का दिला आहे. केसनंद–वाडेबोल्हाई पंचायत समिती गटातून कुशाल सातव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

या प्रवेश कार्यक्रमात बोलताना आमदार राहुल कुल यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा अनुभव सांगितला राहुल कुल म्हणाले, साधारणपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक जण पक्षप्रवेश करतात. मात्र माझ्या राजकीय प्रवासात मला उमेदवारी आधी आणि नंतर पक्ष प्रवेश असं तीन वेळा करावा लागले आहे.

2014 मध्ये आधी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवारी घेतली आणि त्यानंतर पक्षात प्रवेश केला. 2019 मध्ये आम्ही राष्ट्रीय समाज पक्षात असतानाच माझ्या पत्नीला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे पत्नी एकापक्षात आणि मी दुसऱ्या पक्षात अशी घरातली स्थिती झाली होती. त्यावेळी माझ्या मुलांनी देखील मला विचारलं की आई एका पक्षात आणि तुम्ही दुसऱ्या तर मग माझा पक्ष कोणता तेव्हा मी त्याला म्हणालो की तुला ज्या पक्षात जायचे त्या पक्षात जा तेव्हा त्याने मी आईच्या पक्षात जातो असे सांगितले.

त्यानंतर 2019 मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालो असताना माझ्या हातात दोन एबी फॉर्म होते — एक राष्ट्रीय समाज पक्षाचा आणि दुसरा भारतीय जनता पक्षाचा होता. दुपारी बारा वाजता मुख्यमंत्र्यांनी मला भाजपचा एबी फॉर्म भरण्याचा स्पष्ट आदेश दिला. त्या वेळी आमची मिरवणूक राष्ट्रीय समाज पक्षाची निघाली होती. मात्र पावणे तीन वाजता मी भारतीय जनता पक्षाचा एबी फॉर्म भरला. साडेतीन ते चार वाजेपर्यंत मी एकटाच जाणत होतो की कोणत्या पक्षाचा फॉर्म भरला आहे. चार वाजता सर्वांना कळले की मी भाजपचा एबी फॉर्म भरला आहे.

“त्या क्षणी मुख्यमंत्र्यांचे ऐकायचे की नाही, एवढाच प्रश्न माझ्यासमोर होता. मी मुख्यमंत्र्यांचे ऐकण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळेच आज मी येथे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांनी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता कामाला लागावे, सगळं नीट होणार आहे,” असा विश्वासही आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT