Pune Zilla Parishad Sarkarnama
पुणे

Pune Zilla Parishad Elections: पुण्यात 'मिनी मंत्रालयाच्या' निवडणुकीत बड्या नेत्यांच्या वारसदारांची एन्ट्री! ZP चा आखाडा राजकीय जॅकपॉट ठरणार?

Political News :पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नेतेमंडळींचे नातलग कामाला लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी कुटुंबातील नातलगांना मैदानात उतरवले असल्याने बड्या नेत्यांच्या नातलगाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे मिनी मंत्रालयाची निवडणूक म्हणून पहिले जाते. राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी निवडणुका होत आहेत. त्यासाठी आता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच दिसत आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. तर दुसरीकडे येत्या काळात होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नेतेमंडळींचे नातलग कामाला लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी कुटुंबातील नातलगांना मैदानात उतरवले असल्याने बड्या नेत्यांच्या नातलगाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, माजी आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil), माजी आमदार पोपटराव गावडे यांचे नातलग मैदानात उतरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नातलग उतरल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे 73 गट आणि पंचायत समितीच्या 146 जागांसाठी लढत होत आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेच्या बावडा गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या निवडणुकीत त्या या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. अंकिता यांचा विवाह शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी झाला आहे. हर्षवर्धन पाटील आणि ठाकरे ही दोन्ही राजकीय घराणी असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समितीच्या गणातून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे पहिल्यांदाच चिरंजीव श्रीराज भरणे यांना निवडणुकीत उतरवले आहे. बोरी पंचायत समितीच्या गणातून श्रीराज राजकारणात नशीब आजमावून पाहणार आहेत.

इंदापूरच्या राजकारणात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राजकीय शत्रू मानले जातात. मात्र, भरणे मुलासाठी, तर पाटील मुलीसाठी राजकीय वैर विसरून एकत्र आले आहेत. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप (BJP) सोडून या पक्षात प्रवेश केला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र असल्याने भरणे आणि पाटील यांचे मनोमीलन झाले आहे. त्यामुळे पाटील आता गारटकर आणि माने यांच्या विरोधात उभे राहिले आहेत. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची पत्नी स्वरूपा थोपटे या भोरमधून पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या आहेत. संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीत थोपटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भोर नगर परिषदेमध्ये अनेक वर्षांपासून माजी मंत्री अनंतराव थोपटे आणि त्यानंतर माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता होती. मात्र, आता अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ची सत्ता आली आहे.

शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हा परिषदेच्या टाकळी हाजी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावडे माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील लक्षवेधी ठरत असलेल्या या नातलगांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT