Pune Zilla Parishad  sarkarnama
पुणे

Pune ZP : बारामती, दौंड, शिरूरमधील ZP शाळांवर अचानक धाडी; प्रशासनाची धाकधूक वाढली! मुंढेंचे अधिकारी मैदानात

Pune Zilla Parishad : शिक्षण विभागाने केवळ नियम सांगून विषय संपवलेला नाही, तर प्रत्यक्ष धडक तपासणीची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात बारामती, दौंड आणि शिरूर या तीन तालुक्यांतील कोणत्याही शाळांमधून धान्याचे नमुने अचानक गोळा करून ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील.

Sudesh Mitkar

Pune News, 26 Aug : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेवरून पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग भलताच ॲक्शन मोडमध्ये आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छ, पौष्टिक आणि संतुलित आहार मिळालाच पाहिजे, असा ठाम पवित्रा घेत शिक्षण विभागाने शाळा प्रशासनाला थेट 'फर्माने' जारी केले आहेत. "धान्याची मागणी गरजेनुसारच नोंदवा, उगीच साठा करून ठेवला किंवा धान्याच्या गुणवत्तेत झोल दिसला तर खैर नाही," असा रोखठोक दमच जिल्हा परिषदेने दिला आहे.

बिनकामाचा साठा साचवला तर कारवाई!

शाळांमध्ये धान्याचा अनावश्यक खच साचवून ठेवण्याचे प्रकार आता चालणार नाहीत. शाळांनी शिल्लक साठ्याचा नियमित आढावा घेऊन पुढील गरजेनुसारच मागणी नोंदवायची आहे. भारतीय अन्न महामंडळाकडून प्राप्त होणाऱ्या तांदळाच्या पोत्यांवरील उत्पादनाची तारीख, वापरण्याची मुदत आणि प्रत्यक्ष वजन काट्यावर तपासूनच माल ताब्यात घ्यावा लागणार आहे. गुणवत्तेबाबत थोडी जरी शंका आली तर गप्प न बसता प्रकरण तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल. जिल्ह्यात ठरवून दिलेल्या साप्ताहिक 'मेनू कार्ड'नुसारच विद्यार्थ्यांना रोज पोषण आहार दिला जाणार आहे.

FDA चे अधिकारी उतरणार मैदानावर!

विद्यार्थ्यांच्या ताटात जाणारे अन्न किती सुरक्षित आहे, हे पाहण्यासाठी आता तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची थेट 'शाळा' भरवली जाणार आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे आयुक्त असलेल्या अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी स्वतः मैदानावर उतरून स्वच्छता, अन्न सुरक्षितता आणि मानकांचे धडे या सर्व घटकांना देणार आहेत.

३ तालुक्यांत 'सर्जिकल स्ट्राइक'

शिक्षण विभागाने केवळ नियम सांगून विषय संपवलेला नाही, तर प्रत्यक्ष धडक तपासणीची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात बारामती, दौंड आणि शिरूर या तीन तालुक्यांतील कोणत्याही शाळांमधून धान्याचे नमुने अचानक गोळा करून ते शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पुढचा बडगा उगारला जाणार आहे.

तडजोड अजिबात खपवून घेणार नाही!

"विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि पोषण हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत १ टक्काही तडजोड केली जाणार नाही. धान्याची गुणवत्ता, वजन, साठवणूक आणि स्वच्छतेवर आमची कडक नजर असेल. अस जिल्हा परिषद, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT