Pune News, 26 Aug : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनी आणि युवतींनी शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित विविध समस्या मांडल्या. यावेळी तरुणी शरयू चोपडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेमधील कथित गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत विद्यार्थ्यांची कैफियत मांडली होती. आता MPSC कडून तीच भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन या पदासाठी चाळणी परीक्षा घेतली होती. मात्र, या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेच्या दोन दिवस आधी म्हणजे २० मार्च रोजीच लीक झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. सुरुवातीला MPSCकडून पेपरफुटीचा आरोप नाकारण्या आला. पण या आरोपांमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
राहुल गांधींसमोर शरयू चोपडेंची कैफियत
पुण्यातील कार्यक्रमात बोलताना शरयू चोपडे यांनी MPSCच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास आणि पेपरफुटीच्या आरोपांनंतरची परिस्थिती मांडली होती. विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी करूनही सुरुवातीला त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा पाठपुरावा आणि वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला पुढे वेगळे वळण मिळाले, असा दावा शरयू यांनी केला होता. हे प्रकरण आता CIDकडे असल्याचेही त्यांनी कार्यक्रमात सांगितले होते.
विद्यार्थ्यांच्या आरोपांनंतर MPSCचा मोठा निर्णय
दरम्यान, आता आयोगाने २५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेबाबत गैरप्रकाराच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. आयोगाने या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडे प्रकरण सोपवले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशी अहवालात एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
५०६ उमेदवार पात्र; ४८८ मुलाखतीही पूर्ण
या परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला होता. चाळणी परीक्षेतून मुलाखतीसाठी ५०६ उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी तब्बल ४८८ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या होत्या. भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली असतानाच आयोगाने संपूर्ण प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा, निकाल आणि मुलाखतीनंतर निवडीच्या उंबरठ्यावर असलेल्या शेकडो उमेदवारांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
आता पुन्हा परीक्षा; उमेदवारांना पुन्हा शुल्क नाही
आयोगाने औषध निरीक्षक पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच त्यांच्याकडून पुन्हा परीक्षा शुल्क आकारले जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे MPSCच्या परीक्षांची गोपनीयता, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा आयोगावरील विश्वास याबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आता नव्याने होणारी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घेण्याचे आव्हान MPSCसमोर आहे. तसेच कथित प्रश्नपत्रिका गैरप्रकारामागे नेमके कोण होते आणि एका उमेदवाराला प्रश्नपत्रिका कशी मिळाली, याचा तपास CID किंवा संबंधित तपास यंत्रणेकडून काय निष्पन्न होतो, याकडेही राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.