Sunetra Pawar Parth Pawar.jpg Sarkarnama
पुणे

​NCP News: आधी पार्थ पवारांचं दार ठोठावलं, आता थेट पालकमंत्री सुनेत्रा पवारांना साकडं; 'ब्लॅकलिस्ट' करण्यासाठी ZP सदस्यांनी लावली 'फिल्डिंग'

Sunetra Pawar Parth Pawar : मॉडेल स्कूलच्या निकृष्ट कामाबाबत प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने सत्ताधारी गटातील बहुतांश सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला आहे.

Sudesh Mitkar

Pune News: पुणे जिल्ह्यातील मॉडेल स्कूलच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दा आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी लावून धरला आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने सदस्यांमध्ये नाराजी वाढली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने आता हा मुद्दा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मांडण्याचा निर्णय सत्ताधारी सदस्यांनी घेतला आहे.

केंदूर-पाबळ गटातील केंदूर, पाबळ क्रमांक १, केंद्री आणि खेरनेर येथील मॉडेल स्कूलच्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून अनेक कामे अर्धवट असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य तथा बांधकाम समिती सदस्य प्रफुल्ल काळूराम शितोळे यांनी केला आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, या मागणीसाठी शितोळे यांनी राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना निवेदनही दिले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने मॉडेल स्कूलची कामे हाती घेण्यात आली. मात्र, कामे निकृष्ट पद्धतीने झाल्याने इमारतीची दुरवस्था, परिसरातील राडारोडा आणि अर्धवट कामांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप शितोळे यांनी केला आहे.

शितोळे यांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी करून ठेकेदाराकडे कामाच्या दर्जाबाबत जाब विचारला असता, ठेकेदाराने उद्धट व असभ्य भाषेत उत्तर दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाकडून संबंधित ठेकेदाराला वारंवार नोटिसा बजावूनही ठोस कारवाई झालेली नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले होते. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सत्ताधारी सदस्य सुनेत्रा पवारांच्या दरबारी

मॉडेल स्कूलच्या निकृष्ट कामाबाबत प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने सत्ताधारी गटातील बहुतांश सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही प्रश्न सुटत नसल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला आहे.

विशेष म्हणजे, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ प्रफुल्ल शितोळे यांनी सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद इमारतीबाहेर लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनापूर्वी प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, आता सत्ताधारी गटातीलच सदस्यांनी हा मुद्दा थेट उपमुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हा परिषदेतील प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सदस्य असा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT