Girish Bapat sarkarnama
पुणे

प्रश्‍न विमानतळाचा; चर्चा पुणे शहर भाजपातील दुफळीची !

पक्षीय राजकारणात खासदार गिरीश बापट यांना टाळण्यात येत आहे का ? अशी चर्चा या निमित्तानेसुरू झाली आहे.

सकारनामा ब्युरो

पुणे : विमानतळाच्या विषयात केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेण्यासाठी आम्ही गेलो. खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांनादेखील भेटीसाठी येण्याबाबत निरोप देण्यात आला होता. मात्र, तब्बेत बरी नसल्याने ते रूग्णालयात होते. त्यामुळे त्यांना येता आले नाही, असे स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी आज दिले खरे. मात्र, या निमित्ताने शहर भाजपातील दुफळीची चर्चा कार्यकर्तेच करू लागले आहेत.

या संदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना मुळीक म्हणाले, ‘‘ केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची तातडीची वेळ मिळाली होती. त्यांची भेट घेण्यासाठी माझ्यासोबत माजी महापौर मुरलीधर मोहोळ व संघटन मंत्री राजेश पांडे होते. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व खासदार विनय सहस्त्रबुद्धे या भेटीच्यावेळी सोबत होते. खासदार या नात्याने गिरीश बापट यांना दिल्लीला जाण्याबाबत निरोप देण्यात आला होता. मात्र, तब्बेत बरी नसल्याने ते रूग्णालयात दाखल होते. त्यामुळे ते आमच्यासोबत येऊ शकले नाहीत.’’

शहराध्यक्ष मुळीक यांनी खासदार बापट आजारी असल्याने ते रूग्णालयात दाखल होते. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत, असा खुलासा केला असला तरी गुरूवारी ज्यावेळी शहराध्यक्ष मुळीक यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री शिंदे यांची भेट घेण्यात येत होती. त्याचवेळी पुण्यात खासदार बापट यांची लोहगाव विमानतळावर आढावा बैठक सुरू होती.त्यामुळे रूग्णालयात असल्याचे ते दिल्लीला येऊ शकले नाहीत, हा शहराध्यक्ष मुळीक यांचा दावा चर्चेचा विषय ठरला आहे.

पक्षीय राजकारणात खासदार गिरीश बापट यांना टाळण्यात येत आहे का ? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. दरम्यान, या संदर्भात खासदार बापट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पक्षाच्यावतीने दिल्लीला जाण्यासाठी देण्यात आलेला निरोप खासदार बापट यांच्यापर्यंत पोचलाच नाही, असे सांगण्यात येऊ लागले आहे.खासदार पुण्यात, पक्षाचे सारे पदाधिकारी पुण्यात असतानादेखील बापट यांना निरोप मिळाला नसेल तर नेमकी चूक कुणाची याचीही चर्चा रंगली आहे.

दोन महिन्यांपूर्वी ‘जायका’ कपंनीशी करार संपण्याची शक्यता असताना खासदार बापट यांनी पाठपुरावा करत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यामार्फत प्रयत्न करून करार पूर्ववत केला. त्यावेळीदेखील खासदार बापट यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचा शहरातील एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता हे विशेष.शहराचा केंद्र सरकारकडे कोणताही प्रश्‍न असेल तर पक्षाच्या खासदारांमार्फत प्रश्‍नांचा पाठपुरावा करण्याचे संकेत आहेत. मात्र, स्वपक्षाच्या खासदारांना डावलून जाण्याचे प्रकार पुण्यातच घडू लागल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांत या निमित्ताने सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT