Pune court Rahul Gandhi case Sarkarnama
पुणे

Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात मोठी अपडेट; पुण्याच्या विशेष न्यायालयानं राहुल गांधींना फटकारलं

Rahul Gandhi : सावरकर मानहानी प्रकरणात समन्सविषयी केलेल्या विधानांमुळे राहुल गांधींना पुणे विशेष न्यायालयाने फटकारले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे, ( ता. 3 ) स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बदनामी केल्याप्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या समन्स जारी करण्याच्या निर्णयावर आणि कामकाजावर शंका उपस्थित करणारी विधाने केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने फटकारले आहे. राहुल गांधी यांनी मार्च 2023 मध्ये लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते.

त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात सरतपासणीदरम्यान पुरावा म्हणून न्यायालयात सादर केलेली सीडी रिकामी असल्याने पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे तक्रारदारांच्या वकिलांनी आरोपीच्या सरतपासणीसाठी पुढील तारीख मागितली. त्यावर राहुल गांधींचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 309 अंतर्गत अर्ज करून तीव्र आक्षेप नोंदविला.

तक्रारदारांना सरतपासणी व पुरावा नोंदविण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येऊ नये, तातडीने पुरावा पूर्ण करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी अॅड. पवार यांनी केली. या अर्जातील ‘तक्रारदारांनी न्यायालयावर अनावश्यक दबाव टाकून व तातडीचे वातावरण निर्माण करून राहुल गांधींविरोधात समन्स जारी करण्याचा आदेश मिळविला आहे,’ तसेच तक्रारदाराने कायदेशीर पुराव्याऐवजी मर्यादा ओलांडून समन्स मिळविले,’ या वाक्यांवर सात्यकी सावरकरांच्या वकिलांनी आक्षेप घेतला.

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) अर्जातील या विधानांमुळे न्यायालयाच्या निष्पक्ष कामकाजावर शंका निर्माण होत असल्याची तक्रार त्यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर राहुल गांधींच्या वकिलांनी 'तक्रारदारांकडून खटला जाणूनबुजून लांबविण्यात येत असून, पुरावे सादर करण्यात अपयशी ठरत आहे,' असे स्पष्टीकरण दिले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर राहुल गांधींच्या अर्जात न्यायालयाच्या कामकाजावर शंका उपस्थित करण्यात आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

आक्षेप असल्यास योग्य न्यायालयात आव्हान द्यावे : न्यायालय

‘न्यायालयाने काढलेल्या समन्सच्या आदेशाबाबत आरोपीला आक्षेप असल्यास त्यावर योग्य न्यायालयात आव्हान देता येईल. मात्र, त्यावर टिप्पणी करणे योग्य नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशांवर कोणतीही टिप्पणी करू नये. त्यामुळे आरोपीने न्यायालयाच्या अंतिम किंवा आव्हान न दिलेल्या आदेशावर टिप्पणी करू नये, असे स्पष्ट निर्देश विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी राहुल गांधींना दिले आहेत. लोकप्रतिनिधींवर दाखल दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या पुण्यातील विशेष न्यायालयात या याचिकेची सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये तक्रारदारांच्या वतीने अॅड. संग्राम कोल्हटकर यांच्याकडून राहुल गांधींची सरतपासणी घेऊन पुरावा नोंदविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT