Raj Thackeray Speech  Sarkarnama
पुणे

Raj Thackeray Speech : 'माझ्याकडे जेव्हा कधी सत्ता येईल तेव्हा पहिलं काम..' ; राज मनातलं बोलले!

Chetan Zadpe

Pune News : वक्तृत्वाचे वरदान लाभलेले मनसे प्रमुख राज ठाकरे जेव्हाही बोलायला लागतात, तेव्हा हातातले काम सोडून अनेक जण त्यांचे बोलणे ऐकतात. विषय जर राजकारणाचा असेल तर राज ठाकरे यांच्या शा‍ब्दिक कोट्या आणि सत्ताधाऱ्यांवरील प्रखर टीका समोरच्या श्रोत्यांचे लक्ष वेधून घेते आणि टाळ्या, शिट्ट्या मिळवून जाते. पण हेच राज ठाकरे जेव्हा सौंदर्यशास्त्रावर बोलू लागतात तेव्हाही त्यांचे म्हणणे, त्यांचे मुद्दे ऐकून घेण्यासारखेच असतात. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज (ता. २१) अशीच अनुभूती पुण्यात एका कार्यक्रमात आली. आर्किटेक्ट दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या देशात शहराचे वाढते बकालीकरण आणि नियोजनशून्यतेचा अभाव यावर अगदी नेमकेपणाने बोट ठेवले. या वेळी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी जेव्हा कधी आपल्या हातात सत्ता येईल, त्यावेळी पहिले काम येथील शहरांचे नियोजन करण्याचे काम आर्किटेक्टकडेच देईन, असे सांगत शहरांच्या सौंदर्यीकरणामध्ये आर्किटेक्टचे असलेले महत्त्व विशद केले.

शहरांचे होत असलेले बकालीकरण यावर बोलताना राज ठाकरे यांनी आपल्याकडे नियोजनशून्यता कशी आहे, हे सांगितलेच; पण सोबत काही उदाहरणेही दिली. बीडच्या शासकीय विश्रामगृहातील उदाहरण देत ते म्हणाले, तिथल्या एका सूटमध्ये बेडरूमच्या नावाखाली भला मोठा हॉल आहे आणि या हॉलच्या मध्यभागी बेड ठेवलाय. बेड मध्येच का ठेवलाय, हे कोणालाच समजत नाही. तिथे येणाऱ्या एखाद्या जोडप्याने आजूबाजूच्या जागेवर हुतूतू खेळायचा का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

ते म्हणाले, ज्या रामायणाचे दाखले आपल्याकडे दिले जातात. त्यावरचे एक उदाहरण देताना त्यांनी अख्खं रामायण जेवढ्या कालावधीत घडले, तेवढा वेळ आपल्याकडे मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक बांधण्यासाठी लागला, असे सांगत महत्त्वाचे प्रकल्प विनाकारण कसे वेळखाऊ बनतात, याकडे लक्ष वेधले.

मुळात सौंदर्यदृष्टी हवी

मुळात राज्यकर्त्यांमध्ये सौंदर्यदृष्टी असावी लागते. आज मुंबई दर्शनच्या नावाखाली तिथे आलेल्या प्रवाशांना ब्रिटिशकालीन वास्तू आणि शाहरुख खान, सलमान खान यांचे बंगले दाखवले जातात. राज्य सरकारने या शहरात कोणत्या वास्तू उभारल्या, याचा विचार केला तर केवळ तारापोरवाला मत्स्यालय एवढ्या एकमेव वास्तूचा समावेश त्या ट्रिपमध्ये आहे. ही परिस्थिती असेल तर या सगळ्याला कोण जबाबदार? याचा विचार केला पाहिजे, असे सांगत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणावर भाष्य केले.

एक पुणं राहिलंय कुठं ?

पुण्याच्या वाढत्या शहरीकरणाबद्दल बोलताना त्यांनी इथे एक पुणं राहिलंय कुठं, असा प्रश्न उपस्थित करीत हिंजवडीचे पुणे, नदीकाठचे पुणे असे पाच-सहा पुणे तयार झाले आहेत. एखाद्या शहराचा विचार केला तर तिथे क्षेत्रफळाच्या १५ टक्के रस्ते असले पाहिजेत. पुण्यात हेच प्रमाण सात टक्क्यांच्या घरात आहे. उद्या घरातून बाहेर पडल्यावर रस्ताच नाही, अशी वेळ येणार आहे, असे सांगत त्यांनी पुणेकरांच्या भविष्याबद्दलही चिंता व्यक्त केली.

(Edited by - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT