Bhagat Singh Koshyari-Rajendra Pawar  Sarkarnama
पुणे

अस्मितांवर घाला घालणाऱ्या राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारणार नाही : राजेंद्र पवारांच्या भूमिकेने खळबळ!

महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत कारण नसताना वादग्रस्त विधान करणारे आणि आपल्या अस्मितांवर जे घाला घालतात, अशा महान व्यक्तीच्या (राज्यपाल भगतसिंह कोश्यारी) हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा ज्या कृषी विभागाने हा पुरस्कार मला दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते डाॅ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. (Rajendra Pawar refuses to accept agriculture award from Governor Bhagat Singh Koshyari)

नाशिक येथे आज (ता. २ मे) राज्यपाल कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे, विश्वजीत कदम, संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मात्र, राजेंद्र पवार यांनी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दर्शविला आहे.

याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राजेंद्र पवार यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने मला डाॅ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार दिला आहे. या पुरस्काराचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते होत आहे. पण, ज्या महान व्यक्तीच्या नावाने (डाॅ. पंजाबराव देशमुख) हा पुरस्कार दिला जातो. त्यांनी भारतातील शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र्यानंतरच्या मंत्रिमंडळात प्रचंड कार्य केलेले आहे. त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.

आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे मोघलांचे प्रचंड आक्रमण असतानासुद्धा शेतकऱ्यांकडे बरीक लक्ष होतं. त्यांच्या आज्ञापत्रातून आपल्याला हे समजते. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावू नका. उभ्या पिकामध्ये घोडी घालू नका. तुम्हाला स्वराज्यासाठी दोन कांड्या हव्या असतील, तर त्यासुद्धा तुम्ही शेतकऱ्यांना राजी करून घ्या. इतका बारीक विचार करणारा आमचा राजा होता. असं असतानासुद्धा या महाराष्ट्राचा आणि राजाचा इतिहास न समजून घेता वादग्रस्त विधाने करून शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तीकडून पुरस्कार घेणे, मला योग्य वाटत नाही.

सर्वसामान्यांसाठी ज्या महात्मा जाेतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची कवाडे खुली केली. तसेच, १८७० च्या दरम्यान, शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. त्यात शेतकऱ्यांनी कसे राहिले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे. पाणी उपलब्धतेसाठी काय केले पाहिजे. याबाबत विस्तृत मार्गदर्शन महात्मा फुले यांनी केले आहे. (राज्यपालांनी सवित्रीबाई फुले विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात फुले दांपत्याबाबत वाद्‌ग्रस्त विधान केले होते.) महाराष्ट्राच्या इतिहासाबाबत कारण नसताना वादग्रस्त विधान करणारे आणि आपल्या अस्मितांवर जे घाला घालतात, अशा महान व्यक्तीच्या (राज्यपाल भगतसिंह कोश्यारी) हस्ते हा पुरस्कार घेण्यापेक्षा ज्या कृषी विभागाने हा पुरस्कार मला दिला आहे. त्यांच्या कार्यालयात जाऊन हा पुरस्कार घेणे मला अभिमानाचे वाटेल, असेही राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला असता अथवा कृषी विभागाने दिला असता तरी तो मी आनंदाने स्वीकारला असला, असेही राजेंद्र पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT