नसरापूर (जि. पुणे) : राजगड सहकारी साखर कारखाना (Rajgad Sugar factory) हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे. ‘राजगड’चे राजा फक्त ऊस उत्पादक शेतकरीच आहेत. धनदांडग्यांच्या जोरावर कोणीही राजा होण्याचा प्रयत्न करू नये. शेतकऱ्यांचे हित बाजूला ठेवत ६० ते ७० वयाच्या दलबदलू नेत्यांचं पुर्नवसन करण्याचा अड्डा राजगड कारखाना नाही, हे या निवडणुकीत सभासद मतदार दाखवून देतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे (BJP) जिल्हा पदाधिकारी अशोक पांगारे यांनी बोलताना व्यक्त केला. (Rajgad factory election: BJP candidate's campaign begins)
राजगड विकास पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ भोर तालुक्यातील धांगवडी येथील अडबलसिद्ध मंदिर येथे नारळ फोडून करण्यात आला. त्यावेळी झालेल्या सभेत पांगारे यांनी वरील विश्वास व्यक्त केला. दरम्यान, भाजपच्या विलास बांदल यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामचंद्र कुडले, पंडित बाठे, रामदास गायकवाड या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभही याच अडबलसिद्ध मंदिरात होणार होता. तसा पत्रकात उल्लेख होता; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या नेतेमंडळीसह हे तीनही उमेदवार या ठिकाणी फिरकलेच नाहीत. यावरुन विरोधकांची अद्याप एकजुट झाली नसल्याचे दिसून येत आहे.
राजगड कारखान्यासाठी गट क्रमांक दोनमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले भाजपचे उमेदवार विलास बांदल म्हणाले की, राजगड सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून ज्यांच्या ताब्यात आहे, त्यांनी शेतकरी सभासद व कामगारांचे आर्थिक शोषण केले आहे. ते थांबवण्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. राजगडच्या संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांच्या ऊसाला नेहमी कमी भाव मिळतो. ऊस तोडणीसाठी टोळीवाल्यांना पैसे द्यावे लागत आहेत. उसाचे बिल कायमस्वरुपी उशीरा दिले जात आहे. तसेच, कारखाना कामगारांना वेतन आयोगानुसार पगार दिला जात नाही. गेली अनेक वर्षांपासून दिवाळी बोनस नाही, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करुन सरकारकडे वेळेवर भरली जात नाही. गेली १४ महिन्यांपासून बहुसंख्य कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही. अशा प्रकारे कामगार व शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण चालू आहे. या बाबत कोणीतरी जाब विचारणे गरजेचे होते, त्यासाठीच निवडणूक लढतो आहे. सभासद निश्चित आमच्याबरोबर राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तालुकाध्यक्ष जीवन कोंडे म्हणाले की, भोर तालुक्यातील शेतकरी सभासदांसाठी भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निवडणूक लढवत होतो. मात्र, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी अनेक अडथळे आणले. षडयंत्र वापरुन संभ्रम निर्माण करुन अनेक अर्ज माघारी घ्यायला लावले. प्रत्यक्षात स्वतः मात्र कोणताही समेट न करता लढण्याची तयारी केली. निवडणूक ही काँग्रेस नेतृत्वामुळेच लागली आहे. विरोधकांमध्ये दुफळी माजवण्याच प्रयत्न केला आहे; परंतु आम्ही भारतीय जनता पक्ष आमच्याबरोबर कोणी आले तर त्यांच्यासह; अन्यथा त्यांच्याशिवाय शेतकऱ्यांच्या हितासाठी निवडणूक लढून कारखान्याच्या चुकीच्या कारभाराला विरोध करण्यासाठी एकतरी संचालक विजयी करणारच, असा निर्धार व्यक्त केला.
या वेळी भाजपचे बाळासाहेब गरुड, विश्वास ननावरे, डॉ नागेंद्र चौबे, महिला आघाडीच्या अध्यक्षा दीपाली शेटे, स्वाती गांधी, मारुती धोंडे, राजेंद्र मोरे, नीलेश कोंडे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.