Rajnath Singh Sarkarnama
पुणे

Rajnath Singh: राजनाथ सिंह यांचं राहुल गांधींना ओपन चॅलेंज; आता तुम्ही जातनिहाय जनगणनेची 'ब्लू प्रिंट' जनतेसमोर आणाच..!

Maharashtra Aseembly Election 2024 : केंद्र व राज्य सरकारच्या योजना, महिला सक्षमीकरणाबद्दल सिंह म्हणाले, देशातील निम्मी लोकसंख्येला मागे ठेवुन देश केव्हाच सशक्त होऊ शकत नाही. काँग्रेसने महिलांच्या सक्षमीकरण, सबलीकरणाकडे कायम दुर्लक्ष केले.

Deepak Kulkarni

Pune News : विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसून येत आहे. यातच संसदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडुन वारंवार जातगणना करण्याची भाषा केली जात आहे. याच मागणीला आता देशाचे संरक्षणमंत्री आणि भाजप नेते राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप महायुतीच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सिद्धार्थ शिरोळे आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी अनुक्रम खडकी व गोळीबार मैदान येथे राजनाथ सिंह यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यावेळी ते बोलत होते. खडकीत भाजपचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, सुनीता वाडेकर, तर गोळीबार मैदान येथे खासदार मेधा कुलकर्णी, रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) संजय सोनवणे, माजी आमदार दिलीप कांबळे, श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते.

राजनाथ सिंह म्हणाले, आता आम्ही म्हणतो तुम्ही एकदाची जातगनणा तर कराच, पण त्याची 'ब्लू प्रिंट' ही तयार करा. कोणत्या जातीला किती आरक्षण तुम्ही देणार, हे एकदा जनतेसमोर मांडा. केवळ सत्तेसाठी लोकांची दिशाभूल करुन देशाचे विभाजन करण्याचे काम काँग्रेसने थांबवावे अशा शब्दात मंत्री सिंह यांनी जातगणनेच्या मुद्द्यावरुन थेट आव्हान दिले.

राजनाथ सिंह म्हणाले, "काँग्रेसने (Congress) देशात अनेक वर्ष काम केले पण गरीबी कधीही हटली नाही. वारंवार ते सरकार आणा गरीबी हटवू, अशी घोषणा देत होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, आज भारतच नव्हे, आठ वर्षांत भारतातील 25 कोटी जनतेला गरीबीतुन बाहेर काढले आहे. काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. कॉंग्रेस ज्यांच्या गळ्यात पडेल, त्याचे वाईट दिवस सुरु झालेच समजा. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गळ्यात कॉंग्रेस पडली आहे. त्यामुळे या पक्षांचे भविष्यही धोक्‍यात येणार आहे.'

केंद्र व राज्य सरकारच्या योजना, महिला सक्षमीकरणाबद्दल सिंह म्हणाले, "देशातील निम्मी लोकसंख्येला मागे ठेवुन देश केव्हाच सशक्त होऊ शकत नाही. कॉंग्रेसने महिलांच्या सक्षमीकरण, सबलीकरणाकडे कायम दुर्लक्ष केले. भाजप सरकारने महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देत राजकीय क्षेत्रात आरक्षणासाठी कायदा आणला. केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील महायुती सरकारनेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना आणल्या. अडीच लाख महिलांना लाडकी बहिण योजनेद्वारे आर्थिक आधार दिला. वृद्ध नागरीकांवर मोफत उपचारांची योजना आणली.'

डॉ.बाबासाहेब आंबेडकर व संविधानाबाबत ते म्हणाले, "संविधान वाचविण्याची भाषा करणाऱ्या कॉंग्रेसनेच 1951 मध्ये संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुल्याचा गळा घोटण्याचे काम केले. अनेकदा संविधानात दुरुस्ती केली, इतकेच नव्हे तर घटनेच्या प्रस्तावनेतील मुल्यांवरही घाला घालण्याचे काम त्यांनी केले. तेच संविधानाच्या नावाने आता गळे काढत आहेत. डॉ.आंबेडकर यांना जिवंतपणी भारतरत्न देण्याची गरज होती, मात्र कॉंग्रेसने तसे केले नाही. राजकारण सरकार बनवण्यासाठी नव्हे, तर देशासाठी केले पाहीजे.'

भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील विकास कामांसाठी १५ कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. तसेच शिवाजीनगरमधील विकास कामांची माहिती 'विकासनामा'मध्ये आहे. आज त्याचे राजनाथ सिंह यांच्याहस्ते प्रकाशन करताना आनंद होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी हे बोर्ड महापालिकेत समाविष्ट करण्याची गरज असून त्याबाबत राज्य सरकारकडे तातडीने प्रस्ताव पाठवू असंही शिरोळे यांनी सांगितलं.

राजनाथ सिंह यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

- काँग्रेसने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या कामाचे श्रेय दिले नाही

- एका देशात दोन संविधान असू शकत नाहीत, म्हणून कलम 370 हटविले

- राहुल गांधी यांच्या "मोहब्बत की दुकान'मध्ये द्वेषाची विक्री

- रशिया-युक्रेन युद्ध साडेचार तासांसाठी थांबवुन मोदींनी हजारो भारतीय विद्यार्थी सुखरुप आणले

- बाळासाहेब ठाकरेंचा कायम सन्मान, मात्र उद्धव ठाकरेंनी विचारांशी प्रतारणा केली

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगावर भारताची गांभीर्याने दखल घ्यायची वेळ आली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT