Asha Buchke-Rajshri Borkar Sarkarnama
पुणे

अजितदादांच्या कट्टर समर्थक राजश्री बोरकरांचा जिल्हा बॅंकेसाठी अर्ज : आशा बुचकेही विरोधात लढणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री बोरकर आणि भाजपच्या आशा बुचके यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढली आहे.

रवींद्र पाटे

नारायणगाव (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ज्येष्ठ नेत्या राजश्री बोरकर आणि जिल्हा परिषद सदस्या तथा भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या आशा बुचके या दोघांनी सोमवारी (ता. ६ डिसेंबर) महिला राखीव गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या गटासाठी जिल्ह्यात सुमारे ३ हजार ६०० मतदार आहेत. (Rajshri Borkar of NCP and Asha Buchke of BJP filed nomination for Pune District Bank from Junnar.)

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे येथील कार्यालयात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांच्याकडे राजश्री बोरकर आणि आशा बुचके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. बोरकर या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कट्टर समर्थक आहेत. या पूर्वी त्यांनी जिल्हा परिषद सदस्या, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्या नारायणगाव येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या व इंद्रधनू ग्रुपच्या संस्थापिका आहेत. बोरकर यांनी जुन्नर तालुक्यात महिला बचत गटांची स्थापना करून बेरोजगार व विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यास मोठी मदत केली आहे.

दरम्यान, आशा बुचके यांनी शिवसेनेतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्या सलग चार वेळा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या असून तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. या पूर्वी नारायणगाव-वारुळवाडी गटातून बोरकर व बुचके यांनी एकमेकांच्या विरोधात जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. एकमेकांच्या कट्टर राजकीय विरोधक असलेल्या बोरकर व बुचके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जुन्नर तालुक्यात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, जुन्नर तालुक्यातून विद्यमान संचालक आणि जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. ते सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना या पक्षाचा पाठिंबा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT