Ramdas Athawale News Sarkarnama
पुणे

Ramdas Athawale News : महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन अन् पिंपरी महापालिकेत १५ जागांची आठवलेंची मागणी

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : 'आरपीआय' चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे शनिवारी पुणे व पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यात दुपारी दोन वाजता पिंपरी-चिंचवडमध्ये ठेवलेल्या पत्रकारपरिषदेला ते दोन तास उशीरा सायंकाळी चार वाजता आले. पाच वाजताच्या पुण्यातील कार्यक्रमाला जायचे असल्याने फक्त तीन प्रश्नांना उत्तरे देत आठ मिनिटांत त्यांनी पत्रकारपरिषद आटोपती घेतली.

न्यायालयीन कचाट्यात सापडलेली महापालिका निवडणूक या वर्षअखेरीस होण्याचा अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आगामी लोकसभेसाठी महाराष्ट्रात भाजपकडे (BJP) दोन जागांची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. तर, पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिका निवडणुकीत १२ ते १५ जागा मागणार आहे, असे ते म्हणाले. तक्रारी आल्यामुळे बरखास्त केलेली पिंपरी-चिंचवड पक्षाची शहर कार्यकारिणी आणि अध्यक्षांच्या जागी नव्या नियुक्त्या महिन्याभरात केल्या जातील, असे यावेळी पक्षाच्या प्रदेश महिलाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे यांनी सांगितले.

मणिपूर हिंसाचारावर केंद्रातील सत्ताधारी भाजपची चर्चेची तयारी होती. पण, विरोधकांच्या गोंधळामुळे ती होऊ शकली नाही, असा आरोप आठवले यांनी यावेळी केला. लोकसभेला 'एनडी'ए सोबत असल्याने त्यांना महाराष्ट्रात चाळीसपेक्षा अधिक जागा मिळतील, अशी भविष्यवाणी त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलले जाणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्ताकाळात डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या अनेक स्मारकांची भुमीपूजने झाली, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षबांधणीसाठी विभागवार पक्षाची शिबिरे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आरपीआयचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुधाकर वारभूवन, वाहतूक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अझिज शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT