Ramdas Athawale News Sarkarnama
पुणे

Ramdas Athawale News : 'लोकशाही धोक्यात आली असती, तर मोदी...' ; रामदास आठवलेंचा विरोधकांना सवाल!

Sudesh Mitkar

Pune Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यामध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत नाव न घेता शरद पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. मोदींनी केलेला हा उल्लेख विरोधकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यानंतर आता विरोधी पक्षाचे नेते मोदींवर पलटवार करत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींचा 'वखवखलेली आत्मा' असा उल्लेख केला आहे. मोदींच्या या वक्तव्यावरून चौफेर विरोधकांची टीका होत असताना खासदार आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांच्या खास कवितेच्या शैलीमध्ये विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुण्यामध्ये प्रचारासाठी आलेल्या केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. रामदास आठवले(Ramdas Athawale) म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला किमान एक जागा तरी मिळावी यासाठी आम्ही आग्रही होतो. शिर्डी लोकसभा जागेवरून यापूर्वी मी निवडणूक लढवलेली असल्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी आमची महायुतीतील नेत्यांकडे मागणी होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही जागा आम्हाला मिळू शकली नाही. या ठिकाणी एकनाथ शिंदें यांच्यासोबत आलेल्या खासदारांना पुन्हा तिकीट देने आवश्यक असल्याने आम्हाला या जागेवरचा दावा सोडावा लागला.'

मात्र 'विधानसभेला आम्हाला आठ ते नऊ जागा आणि राज्यात मंत्रीपद, महामंडळ अशा अनेक गोष्टी देण्याबाबत युतीच्या नेत्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यामुळे विधानसभेला आम्ही जागा लढू.' असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

परभणी येथून महादेव जानकर(Mahadev Jankar) यांना लोकसभेची जागा देण्यात आली आहे. जानकर हे शरद पवार यांना भेटले त्यामुळे त्यांना ही जागा देण्यात आली का? असा प्रश्न विचारला असता आठवले म्हणाले, 'महादेव जानकर हे शरद पवारांना भेटले म्हणून त्यांना ती जागा मिळाली हे खरे आहे. आम्ही त्यांना भेटलो नाही म्हणून आम्हाला जागा मिळाली नाही.' असं आठवले म्हणाले.

काँग्रेसकडून देशभरामध्ये संविधान बदलणार असल्याबाबतचा अपप्रचार करण्यात येत आहे. मात्र भाजपचं ते धोरण नाही. ज्या भाजपाच्या नेत्यांनी संविधान बदलण्याबाबतची वक्तव्य केली होती. त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली असल्याचे देखील आठवले यांनी सांगितलं.

विरोधकांकडून मोदी यांच्यावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना आठवले म्हणाले, आरोप करायला हरकत नाही, परंतु बिनबुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून होत आहे. जे आत्मे असतात ते सगळीकडे भटकत असतात. नरेंद्र मोदी हे जरी गुजरातचे असले आणि दिल्लीत राहत असले तरी त्यांचा आत्मा देशभरात भटकतो आहे. नरेंद्र मोदी हे गुजरात सोडून सातत्याने महाराष्ट्रात येत असल्याचा आरोप होत आहे. खरंतर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. लोकशाही धोक्यात आली आहे, असं म्हणणाऱ्यांना माझा हा प्रश्न आहे. लोकशाही धोक्यात आली असती तर मोदी मतं मागण्यासाठी आले असते का?

तसेच, या देशात त्यालाच राहण्याचा अधिकार आहे, ज्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मान्य आहे. जर नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात आत्मा भटकत आहे, असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत(Sanjay Raut) यांना केवळ आरोप करण्यासाठीच उद्धव ठाकरेंनी ठेवलेलं आहे. तसेच जे खोके खोके करत आहेत त्यांचं डोकं फिरलं आहे असं देखील आठवले म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT