Political unease grows within NCP after complaints against city president Subhash Jagtap reportedly reached Sunetra Pawar. sarkarnama
पुणे

NCP Politics : राष्ट्रवादीमध्ये धुसफूस, शहराध्यक्ष सुभाष जगतापांच्या विरोधात थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार; 'आधी स्वतः पदे भोगली, आता...'

Pune NCP Subhash Jagtap Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांच्या विरोधात कार्यध्यक्षांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदापासून डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या या नाराजीचा फटका पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार थेट उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या जगताप यांनी गेल्या वर्षभरात शहर कार्यकारिणी तयार न करता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप पक्षाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी केला आहे.

गाडे हे जगताप यांचे मुख्य कार्यक्षेत्र असलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष असून, त्यांनी थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे जगताप यांच्याविषयी लेखी तक्रार केल्याने पुणे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळबळ उडाली आहे.

याबाबत रामदास गाडे पाटील यांनी सुनिता पवार यांना एक पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी सुभाष जगताप यांच्या बाबतच्या तक्रारीचा पाढा वाचला आहे. गाडी म्हणाले, जगताप यांना पक्षाने मागील काळात स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले, २०१४ मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली आणि २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही मानाचे स्वीकृत नगरसेवक पद देऊन पुनर्वसन केले.

एवढेच नव्हे तर, त्यानंतर त्यांच्या खांद्यावर शहराध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवली. यंदाच्या महापालिका निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला असताना, पक्षाने एवढी पदे देऊनही त्यांना पुन्हा महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पद हवे होते, असा दावा गाडे यांनी केला आहे.

शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

हे पद मिळाले नाही म्हणून जगताप पक्षाच्या विरोधात भूमिका मांडत असून पक्षावर नाराज होण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, अजितदादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ताकद देण्याऐवजी जगताप स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाबाबत नाराजी व्यक्त करत असल्याने त्यांच्यावर तातडीने कडक शिस्तभंगविषयक कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी गाडे यांनी थेट सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.

नेमकी नाराजी का?

दरम्यान या सर्व बंडाच्या मागे पश्चिम पुणे भागाची रखडलेली कार्यकारिणी असल्याचे समोर येत आहे. जगताप यांची २ जून २०२५ रोजी पुणे शहराच्या पश्चिम भागाच्या शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्यासोबतच पूर्व भागाचे शहराध्यक्ष म्हणून माजी आमदार सुनील टिंगरे यांची नियुक्ती झाली होती. टिंगरे यांनी तातडीने आपली कार्यकारिणी जाहीर करून अनेक कार्यकर्त्यांना पदे देत पक्षात संधी दिली.

मात्र, जगताप यांनी गेल्या वर्षभरात पश्चिम भागाची कार्यकारिणी जाहीर करणे जाणीवपूर्वक टाळल्याने खऱ्या कार्यकर्त्यांना पदापासून दूर राहावे लागले आहे.असा गाडे पाटील यांनी सांगितला आहे.

पहिल्यांदाच दोन शहराध्यक्ष

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने पुण्यात पहिल्यांदाच दोन शहराध्यक्षांचा फॉर्म्युला राबवला होता. यामध्ये पूर्व भागातील कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगावशेरी या चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सुनील टिंगरे यांच्यावर सोपवण्यात आली असून रूपाली ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख हे त्यांचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. दुसरीकडे, पश्चिम विभागामध्ये पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर हे चार महत्त्वाचे मतदारसंघ सुभाष जगताप यांच्याकडे सोपवण्यात आले असून त्यांच्या प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे हे कार्याध्यक्ष आहेत. परंतु, केवळ जगतापांच्या दिरंगाईमुळे या भागातील जम्बो कार्यकारिणी रखडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT