Actor Ramesh Pardeshi, known for Mulshi Pattern, shares key insights about his meeting with Raj Thackeray and the alleged RSS connection. Sarkarnama
पुणे

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी खडसावलेल्या 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्याचा पंधरा दिवसांच्या आतच मोठा निर्णय, मनसेला धक्का

MNS Politics : मुळशी पॅटर्न फेम अभिनेता रमेश परदेशी यांना मनसे अध्यक्षांनी पदाधिकारी,मनसैनिकांसमोरच कानपिचक्या दिल्याने बैठकीत प्रचंड खळबळ उडाली होती. पक्षनिष्ठा आणि एकनिष्ठेचा ठाकरे ब्रँडचा हा दणका पुन्हा एकदा सर्वांना जाणवला होता.

Deepak Kulkarni

Pune News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यादरम्यान पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची चर्चा करण्यात आली होती. याच बैठकीत राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं लक्ष पुढच्या खुर्चीवर बसलेल्या 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळवलेले आणि मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष तसेच शाखा अध्यक्ष असलेले रमेश परदेशी यांनाही झापलं होतं. याच परदेशींनी आता मनसेची साथ सोडत मनसेची वाट धरली आहे.

मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी मंगळवारी(ता.18) प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेतेमंडळी अन् पदाधिकारी उपस्थित होते.

मुळशी पॅटर्न फेम अभिनेता रमेश परदेशी यांना मनसे (MNS) अध्यक्षांनी पदाधिकारी,मनसैनिकांसमोरच कानपिचक्या दिल्याने बैठकीत प्रचंड खळबळ उडाली होती. पक्षनिष्ठा आणि एकनिष्ठेचा ठाकरे ब्रँडचा हा दणका पुन्हा एकदा सर्वांना जाणवला. यानंतर रमेश परदेशी नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

काही दिवसांपूर्वी रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर आरएसएसच्या संचलनाचा फोटो पोस्ट केला होता आणि त्यात "आरएसएसचा कट्टर समर्थक" असं लिहिलं होतं. हा फोटो राज ठाकरे यांनी पाहिल्याचं लक्षात येताच त्यांनी परदेशीला कार्यकर्त्यांसमोरच खडसावलं होतं. यावेळी ठाकरे यांनी परदेशी यांना "छाती ठोकपणे सांगत होतास मी संघाचा कार्यकर्ता आहे... मग इकडे कशाला टाईमपास करतोस?" असा सवाल केला होता. तसेच त्यांनी "एकाच ठिकाणी कुठे तरी राहा!" असंही म्हटलं होतं.

याबाबत माध्यमांशी बोलताना रमेश परदेशी यांनी आपली बाजू मांडताना राज ठाकरे साहेबांचं बोलण्याचं टायमिंग परफेक्ट आहे आणि त्यांचा मिश्कील स्वभाव देखील सर्वांना माहित आहे. बैठक सुरू असताना त्यांचा अचानकपणे माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांनी विचारलं, फोटोचं काय आहे? त्यावर मी उत्तर दिलं आहे. इतकंच साधं संभाषण झालं.

परदेशी यांनी यावेळी राजसाहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत. त्या अधिकाऱाने ते बोलत असतात आणि त्यांनी बोललंच पाहिजे असं सांगितलं होतं. एक राजकीय पक्ष आणि पक्षासाठी निवडणुका ह्या महत्त्वाच्या असतात. त्यामुळे निवडणुकीच्या कामाच्या दृष्टिकोनातून ते अग्रेसिव्ह बोलत होते.

राज ठाकरे यांनी माझा तो फोटो बघितला. परंतु मी संघाचा स्वयंसेवक आहे. हे मी कधीही लपवलेलं नाही. तसंच मी राज साहेबांशी पक्ष स्थापनेच्या आधीपासून संबंधित आहे. मात्र ज्या पद्धतीने माध्यमांसमोर या सगळ्या गोष्टी आल्या, त्या पद्धतीने त्या घडलेल्या नाहीत, असे परदेशी यांनी स्पष्ट केले होते. पण आता रमेश परदेशी यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची वाट धरत मनसेला धक्का दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT