Ravindra Dhangekar: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीचा गैरव्यवहार अखेर रद्द झाला आहे. धर्मादाय आयुक्तांनी हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या गोखले बिल्डरनं आपण हा व्यवहार रद्द करत असल्याचं म्हटलं होतं. याप्रकरणी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याही सहभागाच्या आरोपांनी प्रकरणं चांगलंच तापलं होतं. कसब्याचे माजी आमदार आणि शिंदे सेनेचे महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. या प्रकरणातील व्यवहार रद्द झाला तरी ते काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. या घोटाळ्यातील लोकांचे सीडीआर तपासा अशी मागणी त्यांनी केली असून कोणालाही या घोटाळ्यातून सुट्टी मिळणार नाही, असा थेट इशाराच दिला आहे.
धंगेकरांनी ट्विट करत म्हटलं की, दुसऱ्याच्या व्यवहारात, व्यवहार थांबविण्याचा शब्द तोच देतो जो त्या व्यवहाराचा लाभार्थी असतो, अदृश्य भागीदार असतो. त्यामुळं बाकीची सुरू आहे ती केवळ नौटंकी...!
जैन बोर्डींग जमीन घोटाळ्यातील सर्वच्या सर्व सहभागींची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. या प्रकरणात सर्वच्या सर्व सहभागी घटक ज्या व्यक्तीच्या संबंधित आहेत त्यामध्ये राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सर्व ट्रस्टी, बिल्डर, धर्मदाय आयुक्त, विना हमी कर्ज देणाऱ्या वित्त संस्था आणि यातील सर्व प्रशासकीय अधिकारी या सर्वांचे ६ ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यानचे कॉल रेकॉर्ड्स आणि CDR रिपोर्ट तपासावेत. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या ज्या लोकांनी जैन मंदिराची जागा हडपण्याचं कट-कारस्थान केलं होतं, त्यांना सुट्टी नाही... नाही...नाही....!
दरम्यान, धर्मादाय आयुक्तांनीच या प्रकरणाचा व्यवहार रद्द केल्यानंतर आता तरी धंगेकर शांतपणे झोपतील, अशी चर्चा सुरु झाली. पण धंगेकरांनी सुरुवातीपासूनच ज्याप्रमाणं या प्रकरणात सहभागी लोकांवर कारवाईपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा घेतला होता. तोच अद्यापही कायम ठेवला आहे, त्यामुळंच आता कोणालाही सुट्टी देणार नाही असा शब्दांत त्यांनी पुन्हा एकदा आपला पवित्रा थेटपणे व्यक्त केला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी परिसरात असलेल्या जैन बोर्डिंगची जागा २३० कोटी रुपयांना विकण्याचा घाट घालण्यात आला होता. यामध्ये बोर्डिंगच्या ट्रस्टींनी धर्मादाय आयुक्तालयाला खोटी माहिती देऊन याचा गोखले बिल्डरसोबत व्यवहार केला होता. या जागेवर बहुमजली टॉवर उभा राहणार होता. विशेष म्हणजे राज्यमंत्री मोहोळ यांनी या व्यवहारात मध्यस्थी केल्याचा आरोप कागदपत्रांच्या आधारे रविंद्र धंगेकर यांनी केला होता. हे सर्वकाही उघड झाल्यानंतर जैन समाजातील नागरिकांकडूनही रोष व्यक्त करण्यात आला. खुद्द जैन मुनींनी देखील या प्रकरणाची दखल घेतली. पण अद्याप या प्रकरणात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कुठलंही भाष्य केलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही चौकशीचे आदेश दिलेले नाहीत. पोलिसांनी देखील कुठल्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल केलेला नाही, त्यामुळं ही नेमकी कसली मिलीभगत आहे? असा प्रश्न आता पुणेकर नागरिक विचारत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.