Ravindra Dhangekar to letter Purushottam Jagtap Sarkarnama
पुणे

Someshwar Sugar Election: “अजूनही वेळ गेलेली नाही, हट्ट सोडा, तुम्ही चुकताय!”; धंगेकरांचं पुरुषोत्तम जगतापांना पत्र

Ravindra Dhangekar to letter Purushottam Jagtap: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना खुले पत्र लिहिले आहे.

Mangesh Mahale

Pune News: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना एक खळबळजनक ‘जाहीर खुले पत्र’ लिहून थेट सवाल उपस्थित केला आहे. "पुरुषोत्तमजी जगताप, तुम्ही चुकताय...!" असे स्पष्ट करत धंगेकर यांनी जगताप यांच्या भूमिकेवर आणि निर्णयांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

अजितदादांच्या विश्वासाशी प्रतारणा

रवींद्र धंगेकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, पुरुषोत्तम जगताप आज सामाजिक व राजकीय जीवनात ज्या उच्च पदावर आहेत, ते केवळ आणि केवळ स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कृपाशीर्वादामुळेच आहे. दादांनी अत्यंत विश्वासाने सलग १२ वर्षे कारखान्याचे चेअरमनपद जगताप यांच्या हाती सोपवले होते. परंतु, आज जगताप यांनी घेतलेली बंडखोरीची भूमिका ही दादांच्या विचारांशी आणि विश्वासाशी प्रतारणा करणारी आहे.

कारखान्याचा विस्तार व विकास दादांमुळेच

सोमेश्वर साखर कारखान्याचा झालेला भव्य विस्तार, अत्याधुनिक डिस्टिलरी प्रकल्प असो किंवा शैक्षणिक व अभियांत्रिकी संस्था असोत; या सर्वांची उभारणी स्वर्गीय अजितदादांच्या काटेकोर नियोजन, अभ्यासपूर्ण आणि कार्यकुशल नेतृत्वामुळेच शक्य झाली. या उपकारांची व ऋणाची जाणीव ठेवणे हे जगताप यांचे कर्तव्य होते, असे पत्रात म्हटले आहे.

कठीण काळात पवार कुटुंबाला धोका

अजितदादांच्या पश्चात आज संपूर्ण पवार कुटुंब आणि परिसर एका कठीण व भावनिक प्रसंगातून जात आहे. अशा वेळी सुनेत्राताई पवार आणि त्यांच्या दोन्ही मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक होते. परंतु, केवळ वैयक्तिक स्वार्थ आणि हट्टाग्रहामुळे जगताप यांनी त्यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आहे, जे राजकीय आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे, धंगेकर यांनी म्हटलं आहे.

"दादा हयात असते तर हे धाडस झाले असते का?"

"जर आज अजितदादा हयात असते, तर त्यांच्या विचारांच्या विरोधात जाण्याचे किंवा त्यांच्या निर्णयाच्या पुढे जाऊन चार वाक्ये बोलण्याचे धाडस तुमच्यात झाले असते का?" दादांच्या पश्चात त्यांच्या अधिकृत पॅनेलला आव्हान देणे हे कृतघ्नतेचे लक्षण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी व कामगारांचे भवितव्य धोक्यात

सोमेश्वर कारखाना हा महाराष्ट्रात सर्वाधिक साखरेचा दर देणारा कारखाना म्हणून नावारूपाला आला आहे. हजारो गरीब शेतकऱ्यांचे आर्थिक हित या कारखान्याशी जोडलेले आहे. परंतु, जगताप यांच्या संकुचित आणि हेकेखोर विचारसरणीमुळे कारखान्याचे भवितव्य धोक्यात आले आहे, तसेच अंतर्गत गटबाजी वाढवून राजकीय भाकड निर्माण केली जात आहे, असे धंगेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही...! आपला हट्ट सोडा

"अजूनही वेळ गेलेली नाही...! आपला हट्ट सोडा, आपल्या चुकीच्या निर्णयावर पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करा आणि अजितदादांच्या अधिकृत पॅनेलसोबत उभे राहा. कारखान्याची एकसंघता टिकवणे आणि दादांच्या कुटुंबाला साथ देणे हीच त्यांना खरी आणि भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल," असे आवाहन धंगेकर यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT