Someshwar Election : सुनेत्रा पवारांनी ‘डॅमेज कंट्रोल’साठी दूत पाठवला, पण जगतापांनी ऐकलंच नाही! सोमेश्वरमधील बंडाची Inside Story

Someshwar election 2026, Purushottam Jagtap Vs Sunetra Pawar: मंगळवारी रात्री व मध्यरात्रींनंतर राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्याशी चर्चा केल्या, मात्र मार्ग निघाला नाही.
Someshwar election 2026, Purushottam Jagtap Vs Sunetra Pawar
Someshwar election 2026, Purushottam Jagtap Vs Sunetra PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

सोमेश्वरनगर (पुणे) : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीने शेवटच्या दिवशी नाट्यमय वळण घेतले. ‘तुतारी’शी न जमल्याने मंगळवारी सायंकाळी बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली होती.

अशात विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांचा स्वतंत्र संवाद मेळावा घेत खळबळ उडवून दिली आणि स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही उमेदवारयादी जाहीर करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवत त्यावर कडी केली. त्यामुळे महिनाभर शांत असलेले ‘सोमेश्वर’चे कार्यक्षेत्र एका रात्रीच्या घडामोडींनी हादरून गेले.

सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी १ ऑक्टोबरला अंतिम उमेदवार यादी प्रशासनाकडून निश्चित होणार आहे. त्यासाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवारी (ता. ३०) होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी अंतिम २१ उमेदवारांची यादी जाहीर करणे अपेक्षित होते. त्यासाठी मंगळवारी कार्यकर्ते आतुरतेने वाट पहात होते. परंतु, अकल्पित घडामोडी घडल्या आणि एकतर्फी वाटणाऱ्या आणि बिनविरोध होईल, अशा वाटणाऱ्या निवडणुकीत कमालीचे रंग भरले.

खासदार पार्थ पवार यांची सोमवारी सोमेश्वरच्या निवडणुकीत एंट्री झाली. इच्छुक मंडळी त्यांना भेटली. संजय जगताप यांच्यासह भाजपला सोबत घेण्याचे ठरले होते आणि त्यानुसार अंतिम यादीवर हात फिरला होता. त्यानंतर सोमवारी रात्रीही यादीवर खलबते झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही चाचपणी करत २१ उमेदवारांची शोधाशोध स्वतंत्रपणे केली होती.

यानंतर मंगळवारी घड्याळ आणि तुतारी या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांची बिनविरोधसाठी मॅरेथॉन चर्चा झाली. मात्र, जागावाटपावरून मेळ न बसल्याने बोलणी फिसकटली. पण, यानंतरही मंगळवारी दोन्ही गटांनी आपापल्या स्वतंत्र उमेदवारी याद्या जाहीर केल्या नाहीत. किमानपक्षी बुधवारी सकाळी याद्या जाहीर होतील, अशी सभासदांना खात्री होती. पण, बुधवारी सकाळी ना घड्याळाची यादी जाहीर झाली ना तुतारीची, उलट त्यात नव्या पॅनेलची भर पडली!

मंगळवारी रात्री व मध्यरात्रींनंतर राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्याशी चर्चा केल्या, मात्र मार्ग निघाला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळी पुरुषोत्तम जगताप यांनी अकरा वाजता वाणेवाडी येथे संवाद मेळावा असल्याचे जाहीर केले, तर राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी भवन’मध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घोषित केला. भाजप नेते संजय जगताप यांच्यासोबत ते बंड करणार, प्रसंगी वेगळा पॅनेल करणार, अशा चर्चा सकाळी वेगाने पसरल्या. राष्ट्रवादीनेही पक्ष कार्यकर्ते एकत्र करत सावधगिरीने, पण आक्रमक पावले टाकली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना पुरुषोत्तम जगताप यांची समजूत घालण्यासाठी पाठवले. मात्र, त्यांनाही यामध्ये अपयश आले. यानंतर संजय जगताप वाणेवाडी येथे दाखल झाले आणि त्यांनीही बंद दाराआड चर्चा केल्या. यानंतर पुरुषोत्तम जगताप व संजय जगताप यांनी पक्षविरहित अजितदादा शेतकरी विकास पॅनेल स्थापन केल्याचे जाहीर केले आणि नाट्यमयतेचा कळस गाठला. यानंतर घड्याळ व तुतारी यांनीही आपला पॅनेल जाहीर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com