Pune, 25 August : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू आहेत. जागा वाटपाच्या प्राथमिक चर्चांमध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार असेल, ती जागा त्या पक्षाला सोडण्याबाबत सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमत असल्याचं बोललं जात आहे.
पुणे शहरात सध्या काँग्रेसचा (Congress) एकमेव आमदार कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये (Kasba Assembly Constituency) आहे. त्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. या मतदारसंघातून पोटनिवडणुकीद्वारे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून रवींद्र धंगेकर हे आमदार झाले आहेत.
भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून निवडणूक जिंकलेल्या रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्येही उतरवलं होतं. मात्र, लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
त्यांच्या कसबा विधानसभा मतदारसंघातही त्यांना पिछाडीवर राहावं लागलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कुठेतरी धंगेकर यांचा दावा कमजोर झाला असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसमधील इतर नेत्यांनीही कसबा विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळावं, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल 12000 मतांनी पराभव केला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्याच कसबा विधानसभा मतदार संघातून धंगेकर यांना तब्बल 15 हजारांची पिछाडी पाहावी लागली.
ज्या प्रभागमधून रवींद्र धंगेकर कित्येक वर्ष पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येत होते. त्या मतदारसंघातही धंगेकर पिछाडीवर राहिल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून तिकीट मिळविताना धंगेकर यांना काहीसा संघर्ष करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांकडून अर्ज मागवले होते. कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास रवींद्र धंगेकर यांच्यासह पाच जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर कमल व्यवहारे, मुख्तार शेख, संगीता तिवारी आणि बाळासाहेब दाभेकर यांचा समावेश आहे. या नेते मंडळींनीही काँग्रेस हायकमांडकडे विधानसभा तिकिटासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर कसब्यातून पिछाडीवर राहिल्याचं पुढे करत यंदा आपल्याला संधी मिळावी, असा प्रचार या इच्छुकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात रवींद्र धंगेकर यांना तिकीट मिळविण्यासाठी पुन्हा आपण कसबा कसा जिंकणार, हे पक्षश्रेष्ठींना पटवून द्यावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.