Girish Bapat-Suresh Palande sarkarnama
पुणे

पुण्याचे बाजीराव गिरीश बापटच : बापट म्हणतात ‘...मग माझी मस्तानी कुठाय!’

पीएमपीएमएल व्यवस्थापनाने पुणे ते पाबळ या मार्गावर बससेवा सुरू केली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या मार्गावरील बससेवेचे उद्‌घाटन करण्यात आले.

भरत पचंगे

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे-पाबळ या पीएमपी बससेवा उद्‌घाटनाच्या निमित्ताने शनिवारी (ता. २९ जानेवारी) पुण्यातील कार्यक्रमात ‘गेल्या ४० वर्षांत ज्यांना कुणी हरवू शकले नाहीत, असे पुण्याचे खरे बाजीराव म्हणजे गिरीश बापट (Girish Bapat)’ असे अ‍ॅड. सुरेश पलांडे खासदार बापटांसमोरच म्हणाले. हे ऐकून मिश्किल बापटांनी डोक्याला हात लावला. मात्र, ‘मी बाजीराव; तर माझी मस्तानी कुठाय,’ असे म्हणत बापटांनी पलांडे यांच्या विधानावर कोटी केली. बापटांच्या या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप व्हायरल होताच सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. (Real Bajirao of Pune is MP Girish Bapat : Suresh Palande)

पीएमपीएमएल व्यवस्थापनाने पुणे ते पाबळ या मार्गावर बससेवा सुरू केली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते या मार्गावरील बससेवेचे उद्‌घाटन करण्यात आले. पुणे, कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, मुखई, जातेगाव बुद्रूक, धामारी ते पाबळ या सर्वच गावांमध्ये या बससेवेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मात्र, हा समारंभ गाजला तो पुण्यात. कारण पुण्यात महापालिका भवनापुढे या बससेवेच्या उद्‌घाटनप्रसंगी शिरुर तालुक्यातील नेते-पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. यात घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे मुखई (ता. शिरूर) येथील संचालक अ‍ॅड. सुरेश पलांडे यांचे भाषण झाले. यात त्यांनी बापटांच्या ४० वर्षांच्या राजकीय जीवनाचा आढावा घेतला. त्यांना पुण्यात कधीच कुणी हरवू शकले नसल्याने तेच पुण्याचे खरे बाजीराव आहेत, या शब्दांत त्यांचे कौतुक केले.

बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकहानीमुळे पुणे-पाबळ जसे जगभरात चर्चेत होते. त्याच धर्तीवर हा मार्ग पीएमपी बससेवेने पुन्हा जोडला. हे काम खासदार गिरीश बापटांनी केल्याने बापटच पुण्याचे बाजीराव असा अ‍ॅड. पलांडे यांचा बोलण्याचा संदर्भ होता. मात्र, त्यांच्या कोटीला बापट यांनी अगदी डोक्याला हात लावून घेत मिश्किल प्रतिसाद दिला.

बापट एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी लगेच पलांडेंना विचारले की, ‘मी बाजीराव तर माझी मस्तानी कुठेय.’ यावर अ‍ॅड. पलांडेंनीही जाहीरपणे सांगितले की, ‘भाऊ तुम्ही खरोखरच बाजीराव आहात. पण, तुमच्या मस्तानीबद्दल आम्हाला अजून काहीही माहिती मिळालेली नाही.’ या शाब्दीक कोट्यांनी ही सभा गाजली. या कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून बापटांच्या या वक्तव्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT