Nana Patole Latest News
Nana Patole Latest News Sarkarnama
पुणे

Nana Patole Latest News : कसब्याप्रमाणेच पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही नाना पटोलेंनी हेरुन ठेवला उमेदवार; तयारीही सुरु झाली अन्...

Amol Jaybhaye

Pune Lok Sabha by-election News : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. दोन्ही पक्षांमध्ये पुणेच्या जागेवरून कलगीतुरा रंगत आहे. गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लाकसभेवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला होता. यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्याची जागा काँग्रेस सोडणार नसल्याचे म्हटले आहे.

तसेच अजित पवार मिरीटचे बोलत असतील तर पुण्यात काँग्रेसचेच मिरीट आहे. त्यामुळे उमेदवार आमचाच असेल, असे पटोले यांनी स्पष्ट केले. तसेच पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार तयार आहे. पक्षाने आणि आमच्या उमेदवाराने तयारीही सुरु केली आहे, असे नाना पटोले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये कसबा विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये भाजपचा अनेक वर्षांचा बालेकिल्ला उद्धवस्त करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. त्यामुळे पुणे लोकसभेच्या पोटनिवणुकीसाठीही काँग्रेसने कंबर कसली आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे चांगला उमेदवार नाही, अशी टीका होत आहे. मात्र, नाना पटोले (Nana Patole) यांनी उमेदवार हेरुन ठेवला आहे. तसेच त्या उमेदवाराने आणि काँग्रेसच्या संघटनेने निवडणुकीचीही तयारी सुरु केली आहे.

त्यामुळे कसब्या प्रमाणेच पुन्हा एकदा पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही काँग्रेस (Congress) सज्ज झाली आहे. पुण्याच्या जागेवर कुणीही दावा केला असला तरी ही जागा काँग्रेसचीच आहे आणि येथे काँग्रेसच निवडणूक लढणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले होते की, "आगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी आहे. यामुळे पुण्याच्या जागेवर पोटनिवडणूक लागणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, पोटनिवडणूक लागणारच असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, पुण्याची जागा लढवायला आपण इच्छुक आहोत, असे ते म्हणाले होते.

“सद्य परिस्थिती पाहिल्यानंतर राष्ट्रवादीची स्थानिक पातळीवर ताकद जास्त आहे. महापालिकेत आम्ही चांगली ताकद दाखवली आहे. या ठिकाणी आमचे ४० नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे दहाच नगरसेवक निवडून आले होते. शहरामध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदारही आहेत. आता ज्यांची ताकद जास्त आहे, त्यांना ती जागा लढवावी,'' असेही अजित पवार म्हणाले होते.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केले होते. पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकी संदर्भात शरद पवार यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावर पवार म्हणाले होते की ''ठिक आहे पाहूया, जे योग्य आहे ते बघूया. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून, यावर योग्य तो मार्ग काढू. यात काळजी करण्याचे काही एक कारण नाही. अशी मागणी आणि दावा सगळेच पक्ष करत राहतात. मात्र, त्या जागी शेवटी कोण प्रभावीपणे लढत देवून विजय मिळवतो, ते पाहावे लागेल.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT