Deenanath Hospital Sarkarnama
पुणे

Deenanath Hospital : सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत गर्भवतीला उपचाराशिवाय थांबवलं : दीनानाथमध्ये 'साडे पाच' तास काय घडलं?

Deenanath Hospital : गर्भवती तनिषा भिसे मृत्यूला दीनानाथ रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीमध्ये ठेवला आहे.

Sudesh Mitkar

Deenanath Hospital : गर्भवती तनिषा भिसे मृत्यूला दीनानाथ रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीमध्ये ठेवला आहे. आरोग्य सेवेचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. या समितीने आज आपला अहवाल सादर केला.

सकाळी नऊ वाजता रुग्णालयात दाखल झालेल्या तनिषाला रक्तस्त्राव होत असतानाही तब्बल साडे पाच तास थांबवून घेतले, उपचार केला नाही. तसेच रुग्णालयाकडून डिपाॅझिट म्हणून 10 लाखांची मागणी केली असल्याचे देखील अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करणार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

साडे पाच तास भिसे कुटुंबियांसोबत रुग्णालयात काय घडलं?

चौकशी समितीने दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे प्रत्यक्ष भेट देवून ईश्वरी भिसे (तनिषा) यांच्या मृत्युबाबतची चौकशी केली. यामध्ये डॉ. घैसास, डॉ. रुचिका कांबळे व रसिका सावंत यांनी भिसे यांची तपासणी केली व त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. तसेच नवजात अर्भक कक्षातील डॉ. शिल्पा कलानी यांची भेट करुन देण्यात आली. कमी वजनाची, 7 महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिने एनआयसीयु उपचार लागतील हे समजावून सांगितले व 10 ते 20 लाख रुपये खर्च लागेल याबाबत कल्पना दिली.

त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही रुग्णाला दाखल करुन घ्या आम्ही पैशाच्या व्यवस्थेकरीता प्रयत्न करत आहोत असे सांगितले. सदर रुग्णालय हे धर्मादाय रुग्णालय अधिकृत असून डॉ. घैसास, डॉ.रुचिका कांबळे, डॉ.शिल्पा कलानी, रसिका सावंत, मिनाक्षी गोसावी, शिल्पा बर्वे, माधुरी पणसीकर, सचिन व्यवहारे, प्रशासक व रवी पालवेकर यापैकी एकाही डॉक्टर किंवा कर्मचारी यांनी सदर रुग्ण धर्मादाय योजनेअंतर्गत पात्र असताना त्या योजनेतुन दाखल करुन घेतले नाही हे स्पष्ट होते.

रुग्णालयांबाबतच्या धर्मादाय रुग्णालय बाबतच्या तरतुदीचा भंग केल्याचे दिसून येते. याबाबत नियमानुसार सहायक धर्मादाय आयुक्त यांनी कारवाई करण्याकरीता शिफारस करण्यात येत आहे. रुग्णालयाच्या खुलासानुसार सदर रुग्ण 5 तास 30 मिनीटे रुग्णालयात होता व डॉक्टरांना कोणतीही कल्पना न देता परस्पर निघून गेला असे नमूद केलेले आहे, मात्र प्रकृती गंभीर असताना रुग्णाचे जीव वाचवण्याच्या दृष्टिकोनातून त्याचे उपचार करण्याच्या आवश्यकता होती. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने नियमांचा भंग केला असल्याचा अहवालात नमूद करण्यात आला आहे.

रुग्णालयातील ग्रीव्हेन्स रिङ्ग्रेसल सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी (पब्लिक रिलेशन ऑफीसर) यांचे मार्फत रुग्णाचे समुपदेशन करुन उपचाराकरीता येणारा खर्च बाबतची माहिती देवून धर्मादाय योजने अंतर्गत दाखल करण्याबाबत समुपदेशन करणे अपेक्षित होते परंतु तसे केले नसल्याचे दिसून येते.

मृत्यु हा "माता मृत्यु" असल्याने याबाबत सखोल चौकशी माता मृत्यु अन्वेषण समिती मार्फत करण्यात येत असून सर्व बाबीची सखोल चौकशी करुन अहवाल व माता मृत्यु अन्वेषण समितीचा अहवाल यावरुन निष्कर्षासह अंतिम अहवाल तयार करण्यासाठी काही कालावधी लागणार असल्यामुळे तो लवकरच सादर करण्यात येईल असं या अहवालाच्या शेवटी नमूद करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT