Uddhav thackeray Sarkarnama
पुणे

उद्धवसाहेबांसाठी येरवड्यातील एक बेड आरक्षित ठेवा : ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर शिंदे गट आक्रमक!

ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या नातवावरही टीका केली होती.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नातवाबद्दल केलेल्या विधानाचा पुण्यातील (Pune) शिंदे गटाने खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. सत्ता गेल्यामुळे ठाकरे यांची मनस्थिती बिघडली असावी. अशा मोठ्या माणसांचे मानसिक संतुलन योग्य राहावे आणि बिघडले असेल तर त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. पुण्यातील (येरवडा) मनोरुग्णालयात अशा प्रकारच्या रुग्णांवर योग्य उपचार केले जातात, असा महाराष्ट्रात नावलौकिक आहे, त्यामुळे उद्धवसाहेब यांच्यासाठी आपल्या रुग्णालयात एक बेड आरक्षित करून ठेवावा, अशी मागणी शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि संपर्कप्रमुखांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठवून केली आहे. (Reserve a bed in Yerawada psychiatric hospital for Uddhav Thackeray : Shinde group's demand)

ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या नातवावरही टीका केली होती. बाप मुख्यमंत्री, कारटं खासदार आणि नातू आता नगरसेवकपदावर डोळे लावून बसलाय, असं विधान ठाकरे यांनी केलं होतं. एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे यांच्यावर टीका केल्याने ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट येरवडा मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र पाठवून ठाकरेंना त्या ठिकाणी पाठवावे, अशी मागणी केली आहे.

Shinde Group Letter

शिंदे गटाचे पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे आणि सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्या सहीने हे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली. राजकारण आणि राजकारणातील विरोध त्या परिस्थितील अनुसुरून त्या त्या जागी असतो. पण, राजकीय व्यासपीठावरून बोलत असताना व्यक्तीगत रोष, आकस, मत्सर याचं दर्शन परवा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून घडलं.

उद्धव ठाकरे यांची टीका करताना एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षांच्या नातवापर्यंत मजल गेली. ज्या बालकाला नीट बोलता येत नाही, अशा बालकाचा राजकारणाशी काय संबंध. ह्या वयात ते नगरसेवकपदाचे तिकिट मागणार आहे का. असं वक्तव्य करण्यापूर्वी उद्धवजींनी त्या बाळाच्या घरच्यांचा कधी विचार केला आहे का. ठाकरे यांचे ते विधान अत्यंत हिन दर्जाचे, पातळीचे आणि खेदजनक आहे, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.

उद्धव ठाकरे गेली कित्येक वर्षे राजकारणात आहेत, ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. त्या लहान बाळाचा राजकारणाशी काही संबंध नाही, हे न समजण्याएवढे ते दुधखुळे नाहीत. तरीही त्यांनी भरसभेत त्याच्यासंदर्भात विधान केले आहे. कदाचित सत्ता गेल्याने, सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडली असावी. अशा मोठ्या माणसांचे मानसिक संतुलन नीट राहावे आणि बिघडले असेल तर त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे आहे. पुण्यातील (येरवडा) मनोरुग्णालयात अशा प्रकारच्या रुग्णांवर योग्य उपचार करतात. तसा संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक आहे. तरी आपल्या रुग्णालयात उद्धवसाहेब यांच्याकरिता एक बेड आरक्षित ठेवावा, ही विनंती, अशा आशयाचे पत्र शिंदे गटाकडून येरवडा मनोरुग्णालय प्रशासनाला लिहित ठाकरे यांना येरवड्याचा मनोरुग्णालयात पाठवा, अशी अप्रत्यक्ष मागणीच करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT