Pune News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात यायला सुरुवात झाली आहे. त्यातच सोमवारी शिरूर लोकसभेतील डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार आमनेसामने आले.
त्यांनी एकाच व्यासपीठावरती बस्तान मांडलं. त्यावेळी डॉ. कोल्हे (Amol Kolhe) यांनी आढळराव पाटलांच्या पाया पडून नमस्कार केला. निवडणुका येतात-जातात, पद येतात जातात, पण माणूस टिकला पाहिजे. त्यासाठी वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी आवश्यक असल्याचे सांगत, महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेऊन मतदान करा, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले. एरवी वैयक्तिक टीका करणाऱ्या आढळराव पाटील (Shivajiro Adhalrao) यांनी कोल्हे यांचे संपूर्ण भाषण ऐकले.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे सोमवारी राजगुरुनगर तालुक्यातील प्रचार दौऱ्यावर होते. या वेळी वाडा गावात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहात डॉ. कोल्हे आणि आढळराव आमने-सामने आले. डॉ. कोल्हे ज्यावेळी सप्ताहात पोहोचले तेव्हा आढळराव पाटील भाषण करत होते. त्यांचं भाषण संपताच कोल्हेंनी पाया पडून त्यांना नमस्कार करत संवाद साधला.
त्यानंतर आपल्या भाषणात डॉ. कोल्हे म्हणाले की, वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी महत्त्वाची आहे. निवडणुका येतात जातात, पद येतात जातात, पण त्यातला माणूस टिकला पाहिजे. हीच भगवंतांची शिकवण आहे. संतांनी प्रत्येकाला आत्मभान दिले.
महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेऊन मतदान करा, असे आवाहन करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, देश पुढची पाच वर्षे कोणाच्या हातात राहणार आहे, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. २०१४ ला गॅस सिलिंडरची किंमत ४५० रुपये होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं गॅस सिलिंडरला पाया पडा आणि मग मतदानाला जा. आज गॅस सिलिंडरचे भाव हजाराच्या पुढे गेलेत. त्यामुळे तीन वेळा पाया पडा, मग विचार करून मतदान करा.
जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो, आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो. त्यामुळे देशाच्या भवितव्यासाठी मतदान करा, असे आवाहनही डॉ. कोल्हे यांनी केले.
एरवी प्रचारादरम्यान, वैयक्तिक टीका करणाऱ्या आढळराव पाटलांनी सोमवारी मात्र, डॉ. कोल्हेंचं संपूर्ण भाषण ऐकले. भाषण संपल्यावर आढळराव पाटील लगेच आपल्या पुढच्या दौऱ्याला रवाना झाले, तर डॉ. कोल्हे यांनी सप्ताहाच्या महाप्रसादात पंगत वाढली.
(Edited By : Sachin Waghmare)
R