Baramati Lok Sabha Constituency : राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेल्या फुटीनंतर पवार कुटूंबियातील मतभेद समोर आले आहेत. कधीही एकमेकांवर टीका न करणारे पवार कुटूंबातील व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून एकमेकांची उणीधुणी काढत परस्परांवर टीकेची झोड उठवित आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये पुढाकार घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरूच आहे.
इंदापूर (Indapur) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र डागले. अजित पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नसल्याची टीका करत अजितदादांचे 2019 पासूनच भाजपसोबत जाण्याचे प्लॅनिंग सुरू होते. पुणे जिल्ह्यात कोणताही आणि कुणीही हस्तक्षेप करायचा नाही, असा त्यांचा अलिखित नियमच होता, म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो, असे रोहित पवार म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार हे 2019 पासूनच साहेबांना सोडण्याचा विचार करत होते. दादा हे सत्तेपासून दूर राहूच शकत नाही. त्यांच्याबरोबर बाहेर पडलेले नेते देखील सत्तेपासून दूर राहू शकत नसल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) साहेबांना सोडलं त्यामुळे लोकांचा आता त्यांच्यावरती विश्वास राहिलेला नाही. साहेबांना सोडून तुम्ही भाजपसोबत गेलाय किती लोकांना आवडलं आहे? एका बाजूला अजितदादा म्हणतात, वातावरण भावनिक करू नका आणि दुसरीकडे तेच भावनिक आवाहन करत असल्याची टीका आमदार रोहित पवारांनी केली.
बारामतीमधून (Baramati) केवळ सुप्रियाताईच निवडून जाणार आहेत. सुनेत्रा काकी जाणार नाहीत. सुप्रियाताईंचे तसेच पवार साहेबांचे काम सर्वांनाच माहित आहे. वातावरण विरोधात जात असल्याचे लक्षात आल्यानंतर धमक्या, चौकशा अशी भीती दाखविली जात आहे. भाजपमध्ये नेते का गेले, हे सर्वांनाच माहित आहे. आम्ही फाईल बाहेर काढू अशा धमक्या दिल्या जातात. सोनाई डेअरीचे चेअरमन प्रविण माने यांनाही अशीच धमकी दिली असावी. शरद पवारांनी माने यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी मदतच केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुनंदा पवार यांनी घेतलेल्या अर्जाबद्दल बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, माझी आई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. माझी आईसुद्धा बाहेरून आली आहे. माझ्या आईला फॉर्म साहेबांनी घ्यायला लावला आहे. तो घ्यावा लागतो. भाजपच्या (BJP) दहशतीला आता नागरिक कंटाळले आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीत देशात इंडिया आघाडीचे सरकार निवडून येणार आहे. महाविकास आघाडीत चर्चेने निर्णय होतात. महायुतीत दिल्लीतून आदेश येतात. त्यांच्याकडे हुकुमशाही असल्याची टीका देखील त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.