Pune News : मराठा आरक्षणाचे नेते, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. जरांगे पाटील 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजेपासून उपोषणाला बसणार आहे. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना 'OBC'तून स्वतंत्र आरक्षण मिळण्यासाठी आंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील उपोषण सुरू करतील.
मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर त्याच्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरवात झाली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिली.
आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले आज पुणे (PUNE) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकाराची संवाद साधला. विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं. आठवले म्हणाले, "लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलणार, अशी अफवा पसरवण्यात आली. त्याचा फटका महायुतीला बसला. इंडिया आघाडीने संविधानाची पुस्तक हातात घेऊन गैरसमज पसरवला. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीच्या जागा कमी झाल्या". महाराष्ट्रातून महायुती 40 जागांवर विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र आम्हाला 17 जागा मिळाल्या. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये संविधानाचा मुद्दा चालणार नाही, आता फक्त विकासाचा मुद्दा चालणार आहे. निवडणुकांमध्ये आम्ही चांगले यश संपादन करू, असा दावा रामदास आठवले यांनी केला.
आठवले म्हणाले, "लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील आम्हाला फटका बसला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी सर्वप्रथम मी केली होती. राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले देखील आहे. मनोज जरांगे मराठा समाजाला OBCतून आरक्षण (OBC reservation) मिळावे, यासाठी आग्रह आहे. मात्र ते देण्यात आले, तरी कोर्टात टिकणार नाही. त्यामुळे यातून मार्ग काढणे आवश्यक असून जरांगे पाटील यांनी पुन्हा-पुन्हा आंदोलनाच्या धमक्या देणे योग्य नाही. त्यांनी सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे. कारण सरकारची त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आहे".
आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये आरपीआयला 10 ते 12 जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. या जागा मिळाल्यास दलितांची मतं महायुतीला मिळण्यास मदत होईल. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका जिंकून महायुती पुन्हा सत्तेवरती येईल, असा दावा रामदास आठवले यांनी केला.
आरपीआय हा छोटा पक्ष असला तरी महायुतीतील मोठा तिन्ही पक्षांनी त्याला सन्मान देणं आवश्यक आहे. महायुतीतील प्रमुख तीन पक्षांनी प्रत्येकी चार-चार जागा सोडल्यास आम्हाला 12 जागा मिळू शकतील. लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही दोन जागा मागितल्या होत्या. त्यामध्ये एक शिर्डी आणि दुसरी सोलापूर लोकसभेची जागा होती. शिर्डीमध्ये जर मला जागा दिली असती, तर ती जागा निवडून आलीच असती. त्याचबरोबर सुजय विखे पाटील हे देखील नगरमधून विजयी झाले असते. मात्र लोकसभेला आमच्या जागांची मागणी मान्य झाली नसली, तरी आता विधानसभेला तिन्ही पक्ष आमचा विचार करतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक आम्ही 'ऊसधरी शेतकरी' या चिन्हावरती लढणार आहोत, अशी घोषणा रामदास आठवले यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.