Rupali Thombare Patil addressing media on the Ashok Kharat case, raising serious concerns over women’s safety and demanding strict investigation. Sarkarnama
पुणे

Ashok Kharat Case : "त्यामुळे रूपाली चाकणकर ते 58 व्हिडिओ नष्ट करतील...", कॅप्टन खरात प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानेच केला खळबळजनक दावा

Rupali Thombare Patil on Ashok Kharat case: कॅप्टन अशोक खरातने 17 वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे श्री ईशान्येश्वर मंदिराची स्थापना करत तिथे शिवनिका संस्थान नावाने ट्रस्ट निर्माण केली आहे. याच संस्थानवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या ट्रस्टी आहेत. येथील गुरूपौर्णिमेला चाकणकर या उपस्थित असल्याचे फोटो समोर आले आहेत.

Jagdish Patil

Pune News, 19 Mar : नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करत त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता एक पेन ड्राइव्ह जप्त केला. ज्यामध्ये जवळपास 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. या माहितीमुळे राज्यात एकच खबळळ उडाली आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये अनेक नामांकित महिलांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

तर दुसरीकडे अशोक खरातचे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत. या फोटोवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

तर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी थेट पत्रकार परिषद घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, हा विषय कोणत्या पक्षाचा, जातीचा नाही तर हा विषय महिलांचा आहे. 1 वर्षापूर्वी या प्रकरणाला वाचा फोडली होती. ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत.

त्यामुळे पोलीस कारवाई करत नव्हते का? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. शिवाय या प्रकरणात 58 व्हिडिओ समोर आले आहेत. म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झालेत का? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी पदापदावरून पायउतार झाले पाहिजे. त्याशिवाय या प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. चाकणकर मॅडम त्या पदावर राहिल्या तर पुरावा नष्ट करणार, असा गंभीर आरोप रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला.

शिवाय सर्व ट्रस्टवर गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. जर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर पूर्ण राज्यात आंदोलन करणार. मी सुनेत्रा पवार यांच्या कानावर हे प्रकरण घालणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, सुनेत्रा पवार यावर निर्णय घेतील. या प्रकरणाचा पक्षाचा संबंध नाही, अजितदादांच्या लाडक्या बहिण सुरक्षित आहेत याची हमी नेत्यांनी दिली पाहिजे, असंही ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कॅप्टन अशोक खरातने 17 वर्षांपूर्वी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे श्री ईशान्येश्वर मंदिराची स्थापना करत तिथे शिवनिका संस्थान नावाने ट्रस्ट निर्माण केली आहे. याच संस्थानवर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या ट्रस्टी आहेत.

येथील गुरूपौर्णिमेला चाकणकर या उपस्थित असल्याचे फोटो समोर आले आहेत. यावेळी भाषणात चाकणकर यांनी खरात हा आपला गुरू असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता चाकणकर यांच्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT