Pune News, 16 Nov : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपले नाव, फोटो, वैयक्तिक ओळख आणि विशिष्ट शैली यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी केल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांच्या या भूमिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सवाल उपस्थित केले.
मात्र, आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी चाकणकरांच्या समर्थनार्थ भूमिका मांडत या वादात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे, आपण स्वतः २०२१ मध्येच भारत सरकारकडे माझे नाव, फोटो आणि वैयक्तिक ओळख यासाठी ट्रेडमार्क नोंदणी केली असल्याचा दावा देसाई यांनी केला.
तृप्ती देसाई म्हणल्या, मी ट्रेडमार्क कायद्यांतर्गत आपल्या नावाची आणि फोटोची क्लास ४१ आणि क्लास ४५ अंतर्गत नोंदणी केली आहे. त्यामुळे स्वतःच्या नावाची आणि ओळखीची कायदेशीर सुरक्षा मिळवण्यासाठी ट्रेडमार्क नोंदणी करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये स्वतःच्या नावाची आणि ओळखीची अशा प्रकारे अधिकृत नोंदणी करणाऱ्या पहिल्या कार्यकर्त्या असल्याची नोंद असल्याचा दावाही त्यांनी केला.
चाकणकरांच्या भूमिकेचे देसाईंकडून स्वागत
रुपाली चाकणकर यांनी स्वतःचे नाव, फोटो आणि वैयक्तिक ओळख यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याबाबत माझी भूमिका सकारात्मक आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावाचा, प्रतिमेचा आणि ओळखीचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार आहे, असे देसाई यांनी म्हटले.
मीदेखील अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळी, महिला सक्षमीकरण आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या ओळखीचे संरक्षण करण्यासाठी २०२१ मध्येच ट्रेडमार्क नोंदणीचे पाऊल उचलले होते. त्यामुळे ट्रेडमार्क नोंदणी हा केवळ सध्याच्या वादापुरता मर्यादित विषय नसून स्वतःच्या कर्तृत्वातून निर्माण झालेल्या ओळखीचे संरक्षण करण्याचा कायदेशीर मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांनी एकमेकींच्या अधिकारांचा सन्मान करावा!
महिलांनी स्वतःच्या नावाची, कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची कायदेशीर ओळख निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. एकमेकींच्या कायदेशीर अधिकारांचा सन्मान करण्याची गरज आहे. नाव कमवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागतो; मात्र त्या नावाचा गैरवापर होऊ नये, यासाठी कायदेशीर संरक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे रूपाली पाटील आणि सुषमा अंधारे यांना टोला लगावला.
कायद्याचा वापर संरक्षणासाठी व्हावा, दडपशाहीसाठी नव्हे. स्वतःची ओळख निर्माण करा, त्या ओळखीचे कायदेशीर संरक्षण करा आणि संविधानाने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाही सन्मान करा, अस सांगत देसाई यांनी चाकणकरांच्या ट्रेडमार्क नोंदणीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.