

Cockroach Janata Party : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने (CJP) देशभरात संघटनात्मक विस्ताराला सुरुवात केली आहे. संघटनेने देशातील १० झोनमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून, विविध राज्यांमध्ये समन्वय समित्याही स्थापन केल्या आहेत. महाराष्ट्रात १५ सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. जंतरमंतरवरील आंदोलनामुळे लक्ष वेधलेल्या सीजेपीच्या विस्ताराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, संघटनेचा निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचा किंवा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सीजेपीने स्पष्ट केले आहे. "आम्ही एक राजकीय दबाव गट आहोत आणि पुढेही तसेच राहणार आहोत. भविष्यात राजकीय पक्ष स्थापन करण्याची आमची योजना नाही," असे संघटनेच्या राष्ट्रीय माध्यम समन्वयक सुभश्री दास यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह १० राज्यांमध्ये नियुक्त्या
१४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या निवेदनानुसार, पश्चिम झोनच्या प्रभारीपदी क्षितिज पगार, तर उत्तर झोनच्या प्रभारीपदी डॉ. विवेक सांगवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर झोनच्या समितीत मोहम्मद जुनैद आणि गिगराज जोर्ली यांचाही समावेश आहे.
याशिवाय जम्मू-काश्मीर, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या राज्यांसह ईशान्य झोनमध्ये समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक १६, महाराष्ट्रात १५, झारखंड आणि ईशान्य झोनमध्ये प्रत्येकी १४, बिहारमध्ये १३, तर पश्चिम बंगालमध्ये १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींना जाब विचारणार
नव्या पदाधिकाऱ्यांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाचा आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा जाब विचारण्याची जबाबदारी असेल, अशी माहिती सीजेपीचे राष्ट्रीय संघटना प्रभारी अजिंक्य शिंदे यांनी दिली. सुरुवातीला लोकसभा मतदारसंघनिहाय काम केले जाणार असून, सदस्यसंख्या वाढल्यानंतर विधानसभा मतदारसंघ स्तरावर संघटनेचा विस्तार करण्यात येणार आहे.
दरम्यान, तरुणांना संघटनेशी जोडण्यासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सदस्य नोंदणी मोहीम राबवली जात आहे. इच्छुकांना क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन सदस्य होता येणार असून, नोंदणीनंतर डिजिटल ओळखपत्र दिले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.