Chitra wagh | Rupali chakankar  Sarkarnama
पुणे

चित्रा वाघ अडचणीत; "मंदीत संधी साधणारे" म्हणत 'कडक' कारवाईचा चाकणकरांचा आदेश

Chitra Wagh | BJP | Raghunath Kuchik | : वाघ यांनी बळजबरीने जबाब द्यायला लावल्याचा पिडीतेचा आरोप

सरकारनामा ब्युरो

पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने आज नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले तसेच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला वाघ यांनीच भाग पाडलं, असाही आरोप पिडीत तरुणीने केला असून सादर केलेले मेसेजचे पुरावे देखील खोटे असल्याचे देखील तरुणीने म्हटले आहे.

संबंधित तरुणीने 'साम टीव्ही'शी बोलताना चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणले, असा पीडितेचा आरोप आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पिडीत तरुणीने केला आहे. त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हंटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोपही या पीडित तरूणीने केला आहे.

त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याप्रकरणात कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणात, राजकारणात जे घडतंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी असे षडयंत्र केलं जातंय. यंत्रणेचा असा गैरवापर करणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. भाजपकडून दररोज सकाळी एक स्क्रीप्ट तयार केली जाते. त्यानुसार दिवसभर ती स्क्रीप्ट वाचून नाट्य केलं जातं. महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हे सर्व केलं जात आहे.

पण शेवटी दुध का दुध आणि पाणी का पाणी झालेच. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी संबंधित पिडीतेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये आपली संपूर्ण वैद्यकीय चाचणी करावी म्हणून मागणी केली होती. त्यानुसार पोलिसांना निर्देश देवून आपण तिची संपूर्ण वैद्यकीय तपासणी देखील केली. ज्या ज्या वेळी पिडीतेने मदत आणि सहकार्य मागितले, त्या त्यावेळी ते दिले आहे. पण यामध्ये काही व्यक्ती स्त्री सुरक्षेच्या दृष्टीने टाहो फोडतात, पण स्वतःच्या राजकीय हव्यासापोटी एका युवतीचे संपूर्ण आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे मंदीत संधी साधणारे हे लोक आहेत.

पण तिला न्याय देण्याच्या उद्देशाने आज मी पीडितेची भेट घेणार आहे. तिने सविस्तर माहिती दिल्यानंतर, तिची जर कोणी बदनामी करत असेल, तिचे आयुष्य उद्ध्वस्त करत असेल तर राज्य महिला आयोगाकडून कडक कारवाईचे निर्देश देण्यात येणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. तसेच आणि तिला संपूर्णतः संरक्षण देणार असल्याची ग्वाही देखील चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT