Pune News : भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले आहे. थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या घोषणेनंतर मतदारसंघातील निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. मतदारसंघातील ही नाराजी आता उघड झाली आहे.
भाजपचे मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आपल्या नाराजी बाबत पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी निष्ठावंतांना डावलून अशा प्रकारे बाहेरच्या नेत्यांना प्रवेश दिला जात असल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे.
या पत्रामध्ये जाधव यांनी म्हटले आहे की, ज्यांचा आयुष्यभर तिरस्कार केला ते उद्या आपल्या सोबत येणार याचं विशेष आश्चर्य वाटलं. जुन्या जाणत्या वडीलधाऱ्या लोकांची एक म्हण आठवली की, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, संग्राम थोपटे यांच्या प्रवेशाबाबत निश्चित माहिती समोर आल्यानंतर जाधव यांनी याबाबत नाराजीची ठिणगी टाकली आहे. वेळीच नाराजांची समजूत न काढल्यास भोर विधानसभा मतदारसंघात याचा वणवा होण्यास वेळ लागणार नाही, असं बोललं जात आहे. थोपटे हे २२ तारखेला मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
आपल्या भारतीय जनता पार्टीमधे रोज नवनवीन प्रवेश होत आहेत. खरंतर ही आनंदाची बातमी आहे. खरंच माझ्या पक्षाला आज चांगले दिवस आले, याचा सार्थ अभिमान वाटतो. नुकतीच काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचा प्रवेश होणार हे वाचण्यात आलं. आजवर महाराष्ट्राच्या शासनाच्या कररुपी आर्थिक उलाढालीत आमच्या मुळशी तालुक्याचा नंबर कायम अव्वल राहिला आहे. आमचे मुळशी पर्यटन असो वा माण-हिंजवडी आयटी पार्क असो कायम शासनाच्या तिजोरीत मोठा भार माझ्या तालुक्याने उचलला आहे.
राजकारणात ज्याला मैत्री करता आली त्याला संघटना यशस्वीरीत्या संभाळता आली हा इतिहास आहे. मुळशीच्या भाजप कार्यकर्त्यांचे विविध प्रश्न आज प्रलंबित आहेत, यावर कोण लक्ष देणार? आजवर एकही बडा नेता या भागात फिरकला नाही? ना कोणत्या कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहिला? कार्यकर्ते पक्षासाठी आपले तन-मन-धन लावून काम करतात. प्रसंगी घरदार, स्वतःच कुटुंब वाऱ्यावर सोडतात, पक्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वतःला झोकून देतात.
प्रचाराच्या काळात कार्यकर्ता जपला जातो, त्याला महत्त्व दिले जाते. हाच कार्यकर्ता निवडणूक निकालानंतर मरला का जगला हे देखील पहायला नेतेमंडळींना वेळ नसतो. नेत्यांच्या पायाशी लूडबूड करणारे लोक पुढे जातात आणि हाडाचा कार्यकर्ता कायम दुर्लक्षित रहातो? हे असे का? याचं उत्तर वरिष्ठांनी अवश्य द्यावं, हीच माफक अपेक्षा.., अशी नाराजी जाधव यांनी पत्राद्वारे वरिष्ठांपर्यंत पोहचवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.