
Maharashtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तूळात खळबळ उडवून दिली आहे. दोघांनीही राजकीय व्यासपीठार खुर्चीला खुर्ची लावून बसण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. सोप्या भाषेत दोघांनी जुनी किरकोळ भांडणं विसरून एकत्र येण्याबाबत सूचक विधानं केली आहे. खरंतर अशाप्रकारची विधानं यापूर्वीही आली होती. जागावाटपापर्यंत चर्चा गेल्याचा दावाही करण्यात आला. पण उद्धव ठाकरेंनी धोका दिल्याचा आरोप मनसे नेत्यांकडून करण्यात आला. त्या आठवणी हे नेते आताही सांगू लागले आहेत. पण तेव्हाची आणि आजच्या स्थितीत खूप फरक आहे. हे दोघे भाऊ एकत्र आल्यास काय होईल, याचा काहींनी घेतलेला धसकाच सर्वकाही सांगतो.
राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितापुढे काहीच मोठं नाही, असं म्हणत हात पुढे केला आहे. त्याला उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक साद दिली. पण त्यासाठी त्यांनी अटही घातली आहे. आता ती अट राज मान्य करणार, नाही करणार, दोन्ही बंधू एकत्रित येणार, नाही येणार, या चर्चा पुढील काही दिवस झडतच राहतील. पण खरंच हे दोघे बंधू एकत्र आले तर... याचे महाराष्ट्राच्या राजकारणात कसे पडसाद उमटतील, याचा उहापोह सुरू झाला आहे. याला सर्वात मोठे कारण म्हणजे मुंबई महापालिकेची निवडणूक.
मुंबई महापालिकेवर अनेक वर्षांपासून शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. पण या सत्तेमध्ये भाजपचाही वाटा होता. यावेळची परस्थिती विपरीत आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. ठाकरे पुन्हा भाजपशी हातमिळवणी करण्याची सुतराम शक्यता नाही. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची युती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फुट पडली असून उपमुख्यमंत्री अजित पवारही भाजपसोबत गेले आहेत. तर उद्धव ठाकरे सध्यातरी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. उरली फक्त मनसे, सध्यातरी कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेले नाही.
काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी गेले होते. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये युतीच्या चर्चा झाल्याच्या वावड्या उठल्या. त्यात किती तथ्य हे पुढील काळात समजेलच. पुन्हा राज यांच्या विधानाने पुन्हा चर्चेला वेगळे वळण लागले. मुंबई महापालिकेची निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. त्याचप्रमाणे शिंदेंसह महायुतीची प्रतिष्ठाही मुंबईत पणाला लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कोण-कुणासोबत गेल्यास अधिकचा फायदा होईल, याचे आखाडे बांधले जात आहेत. पण दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास काय होईल, याचे उत्तर तितके सोपे नाही.
मागील निवडणुकीचा इतिहास पाहिला तर शिवसेना 84 जागांसह मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी पक्षात फूट पडली नव्हती. त्याखालोखाल भाजप 82 जागांसह दुसऱ्या तर काँग्रेस 31 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर इतर छोटे पक्ष, अपक्षांचे 14 नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला 9 आणि मनसेला सात जागांवर समाधान मानावे लागले होते. 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत 2017 मध्ये शिवसेनेच्या जागा किंचित वाढल्या होत्या. भाजपने मात्र स्वबळावर लढत मुसंडी मारली होती. तर मनसे आणि काँग्रेसला मोठा फटका बसला होता.
आता ठाकरेंची शिवसेना कमजोर झाली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेला भाजपची साथ असल्याने ते वरचढ मानले जात आहेत. पण असे असले तरी मनसेला सोबत घेण्यासाठी ते आग्रही असल्याचे दिसते. तर ठाकरेंनाही ताकद नसलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा मनसे जवळची वाटू लागल्यास नवल वाटायला नको. याचे कारण म्हणणे मराठी मते. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास मराठी मतांचे विभाजन टाळता येईल, अशी सध्यातरी चर्चा आहे. हिंदी म्हणजे उत्तर भारतीय मते मोठ्या प्रमाणात भाजपकडे म्हणजे महायुतीकडे जाऊ शकतात. ती कसर ठाकरे बंधुंची युती मराठी मतांमधून भरून काढू शकते. असे झाल्यास भाजपसह शिंदेंनाही फटका बसू शकतो.
लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईत आघाडीने तर विधानसभेला युतीने आपली ताकद दाखवली आहे. पण महापालिकेतील चित्र ठाकरे एकत्र आल्यास वेगळे दिसू शकते. दोघे बंधू एकत्र आल्यास केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रतील महापालिका व इतर निवडणुकांवर त्याचा परिणाम होईल. पण हे दोन पक्ष एकत्रित आल्यास काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीबाबत ठाकरे काय निर्णय घेणार, हेही महत्वाचे असेल. राज ठाकरे यांनी मराठीसाठी सर्वांनी एकत्र येत एकच पक्ष असावा, अशीही भूमिका मांडली आहे. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरच शरद पवार किंवा काँग्रेसला ते स्वीकारतील का, हाही प्रश्नच आहे.
दोन्ही काँग्रेसला बाजूला सारत दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास पुन्हा मराठी मतांचेच विभाजन होणार हे नक्की. कारण हिंदी मते दोन्ही काँग्रेसच्या बाजूने फारशी नाहीत. त्यामुळे त्यांना सोबत घेतले तरच मराठी मतांची ताकद ठाकरेंना दाखविता येऊ शकते. अन्यथा एकत्र येऊनही महायुतीचा पराभव करणे, ठाकरेंच्या युतीला कितपत शक्य होईल, याबाबत साशंकता आहे. मुंबई ठाकरेंचीच अशी फ्लेक्सबाजी मुंबईत सुरू झाली आहे. हे प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर मराठी मतांची एकी महत्वाची ठरणार आहे. शाळेतील हिंदी भाषेची सक्ती, मराठी माणसांना एकत्र आणू शकते? याचे उत्तर ठाकरे बंधूंच आपल्या कृतीतून देऊ शकतील. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंच्या घरी जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी या संभाव्य युतीबाबत भाष्य न करणे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.