पुणे : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज (ता. २६ सप्टेंबर) पुण्यात येणार आहेत. वडगाव शेरीत मेळावा घेत संजय राऊत भाजपला आव्हान देणार आहेत. कोथळा काढण्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राऊत यांना पुण्यात फिरू देणार नसल्याचा इशारा भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिला होता, त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत थेट जगदीश मुळीक यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. राऊतांच्या पुणे दौऱ्यावर भाजप काय भूमिका घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ या ठिकाणच्या पक्षाच्या वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका पाहता राऊत यांचा आजचा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे. महापालिका निवडणुकीत किती नगरसेवकाचा प्रभाग असावा? याविषयी महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे या विषयावर राऊत आपली काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या या दौऱ्यात लोणावळा या ठिकाणी राऊत हे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करणार आहे. त्यांतर भोसरी या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. तीन वाजता वडगाव शेरी येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आढावा बैठक घेणार आहेत.
राऊतांनी कोथळा बाहेर काढण्याचे वक्तव्य केले ते निषेधार्ह आहे, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या विरोधात डेक्कन पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी मुळीक यांनी केली होती. मुळीक यांचा वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आहे. राऊतांना पुण्यात फिरु न देण्याचे आव्हान मुळीक यांनी दिले होते. त्यानंतर राऊत हे मुळीक यांच्याच मतदारसंघात मेळावा घेणार आहेत.
संजय राऊतांना अडवून दाखवा
शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी मुळीक यांच्या विरोधात दंड थोपटले होते. राऊत पुण्यात येणार, अडवूनच दाखवा असे आव्हान शिवसेनेने भाजप नेत्यांना दिले होते. राऊतांना अडविण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना स्टाईलने भाजपला उत्तर देण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.