Sanjay Raut Sarkarnama
पुणे

Sanjay Raut News : '...अन्यथा, भाजप एक ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही' ; संजय राऊतांचा हल्लाबोल!

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे भाजप आणि केंद्र सरकारला EVMच्या मुद्द्यावरून घेरताना दिसत आहेत. ईव्हीएमचा मुद्द्यावरून एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसने रान उठवले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून EVMचा मुद्दा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मागे पडल्याचा पाहायला मिळत आहे. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे.

'भाजप निवडणुकांमध्ये मिळालेले यश हे त्यांच्या पक्षाचे नाही, तर त्यांनी EVM मशीन मध्ये केलेल्या घोटाळ्याचे यश आहे. EVMचा पूर्वी मी सुद्धा समर्थक होतो, परंतु मध्यप्रदेश मध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर माझी खात्री पटली आहे की EVMमध्ये भाजपने निश्चितच घोटाळा केला आहे आणि त्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे. जर ईव्हीएम नसेल तर भाजप देशांमधील एक ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा जिंकू शकत नाही.', असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

पुण्यात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे संजय राऊत यांची मुलाखत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी घेतली. (Sanjay Raut Vs BJP )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी संजय राऊत म्हणाले, 'राजकारण करायचे असेल तर मनामध्ये भीती बाळगून चालत नाही. भीती खुंटीला टांगल्याशिवाय राजकारणामध्ये यशस्वी होता येत नाही. राजकारणामध्ये विरोधकांचाही सन्मान केला पाहिजे, ही शिकवण बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला दिली. परंतु सध्या मात्र विरोधकांना संपवण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सुरू आहे.

या संघर्षामध्ये शिवसेना कायम लढत राहणार आहे. माझ्यावर शिवसेना संपवण्याचे आरोप केले जातात. परंतु जे आरोप करतात तेच लोक शिवसेना सोडून जातात आणि आम्ही मात्र शिवसेना वाचवण्याचे काम गेल्या ४० वर्षांपासून करत आहोत आणि यापुढेही करत राहणार आहोत.'

याचबरोबर संजय राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले, 'देशाच्या संसदेमध्ये गेल्या 22 वर्षांपासून मी खासदार म्हणून काम करत आहे. परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये संसद लोकशाहीचे मंदिर राहिलेले नाही, तर त्या ठिकाणी केवळ आरडाओरडा करून एकमेकांचे गळे दाबण्याचे आणि लोकशाही संपवण्याचे काम सुरू आहे. देशामध्ये बेरोजगारी वाढत आहे. भ्रष्टाचार वाढत आहे, परंतु या संबंधात बोलणाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकले जाते.'

'महाराष्ट्र खड्ड्यात घालणारेच आज सत्तेमध्ये बसले आहे, अशा लोकांवर थुंकायचे नाही तर काय फुले उधळायची का? कोणी एकेकाळी महाराष्ट्र दिल्लीमध्ये ताठ मान करून वावरत होता. परंतु आज मात्र या भ्रष्टाचारी आणि बेईमान लोकांमुळे महाराष्ट्राची मान संपूर्ण देशांमध्ये शरमेने खाली गेली आहे. त्यांच्या विरोधातील लढा शिवसेना कायम सुरू ठेवणार आहे.' असा निर्धार संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यकारभाराच्या नावाखाली बेबनाव -

'महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या अनागोंदी कारभार सुरू आहे. तीन नेत्यांचा एकमेकांमध्ये संवाद नाही, राज्यकारभाराच्या नावाखाली बेबनाव सुरू आहे. एका मंत्राने मराठ्यांची बाजू घ्यायची दुसऱ्या मंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, अशा प्रकारची नौटंकी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणतीही ठोस भूमिका न घेता केवळ मराठ्यांचीच नव्हे, तर ओबीसींची फसवणूक केली जात आहे. हे हा समाज उघड्या डोळ्याने पाहत आहे आणि हाच समाज त्यांना निवडणुकीमध्ये निश्चितच उत्तर देईल.'

'अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर हे भाजपने उभारलेले नाही. तर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मंदिर समितीने हे मंदिर उभारले आहे. परंतु पंतप्रधान मोदी(PM Modi) मात्र उपवासाचे नाटक करून देशाची दिशाभूल करत आहेत. देशातील लोकांना जेव्हा अंगावर वस्त्र नाही, म्हणून महात्मा गांधी तसेच आयुष्यभर वावरले, त्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे दररोज चटईवर झोपणार आहेत काय? असा सवाल करतानाच ही नौटंकी त्यांनी बंद करावी आणि जनतेच्या मूळ प्रश्नांकडे लक्ष द्यावे.' असे आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT