Prashant Jagtap on Santosh Pandit Arrested sarkarnama
पुणे

Santosh Pandit Arrest : मध्यरात्री संतोष पंडितांना अटक; काँग्रेस रस्त्यावर उतरणार! प्रशांत जगतापांचा सरकारला इशारा

Prashant Jagtap Pune Congress : युट्युबर संतोष पंडित यांना गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले. या विरोधात काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे आक्रमक झाले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : कोथरूडमधील विकासकामांवरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला प्रश्न विचारणारे युट्युबर संतोष पंडित यांना गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. अश्लील शेरेबाजी आणि वक्तव्य केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी या अटकेवरून आता पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "सामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही," असा थेट इशारा जगताप यांनी दिला आहे.

कोथरूड परिसरातील विकासकामा बाबत तयार केलेल्या व्हिडिओमधील वक्तव्यावरून कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याच तक्रारीच्या आधारे गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी पोहोचून ही धडक कारवाई केली.

संतोष पंडित यांच्या अटकेची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सरकारवर टीका केली आहे. जगताप म्हणाले, "पुण्यातील नागरिक आणि सामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडणारे रील स्टार संतोष पंडित यांना रात्रीच्या वेळी अटक करण्यात आली आहे. राज्यात आणि देशात हुकूमशाही आणि दादागिरीचे राजकारण सुरू आहे. जेव्हा एखादा नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्ता सरकारला प्रश्न विचारतो, तेव्हा त्याला त्रास देण्यासाठी ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांना पुढे करून खोट्या तक्रारी दाखल करायला लावल्या जात आहेत.

अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरणार

जगताप पुढे म्हणाले, "लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न कराल, तेवढा जनअसंतोष बाहेर पडेल. संतोष पंडित यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि त्यांची सुटका करावी. अन्यथा काँग्रेस पक्ष याविरोधात न्यायालयात तर लढा देईलच, शिवाय सर्व सामाजिक संघटनांना एकत्र आणून रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही." असा इशारा जगताप यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT