Old Pension Scheme
Old Pension Scheme  Sarkarnama
पुणे

Pune News : ग्रामपंचायतीने वाढवले संपावरील कर्मचाऱ्यांचे टेन्शन; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित केली 'ही' मागणी

सरकारनामा ब्यूरो

Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील शासकीय कर्मचारी वर्गाने गेल्या काही दिवसांपासून बेमुदत संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी या शासकीय कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ही योजना लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर भार पडेल, असं सरकारचं म्हणणं आहे. या संपामुळे जनतेची काम खोळंबली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा संप मागे घेण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. मात्र, कर्मचारी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम आहेत.

आता पुणे जिल्ह्यातील रौंधळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच नाना नारायण रौंधळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित संप करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा निषेध करत जुनी पेन्शन योजना शासकीय कर्मचाऱ्यांना नाही तर शेतकऱ्यांना सुरू करा, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या या पत्राची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

काय आहे रौंधळवाडी ग्रामपंचायतीचे पत्र?

''राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचे भरपूर लाड पुरवले, सरकार तुम्ही जरा थांबा. राज्यातील शासकीय कर्मचारी वर्गाने जुनी पेन्शन योजना लागू करणे व मागण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना काम कमी आणि गडगंज पगार आणि त्यातूनही कामात करत असलेले दिरंगाई व शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर होत असलेला भ्रष्टाचार या सर्वांचा विचार करता यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे योग्य नाही. जुनी पेन्शन योजना लागू करणे म्हणजे सरळ सरळ सर्व सामान्य जनतेवर व शेतकरी वर्गावर आर्थिक भार. राज्य सरकार घरातून पैसे आणत नाही हा पैसा सर्व सामान्य जनतेचा व शेतकरी वर्गाचा आहे.

त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे की, आपण जुनी पेन्शन योजना चालू करू नये. ज्या काही पेन्शन योजना चालू करायच्या आहे त्या माझ्या शेतकरी वर्गासाठी चालू करा ही नम्र विनंती''. असं पत्र रौंधळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. त्यांच्या या पत्राची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT