Gram Panchayat Elections 2026 Sarkarnama
पुणे

Gram Panchayat Election : सरपंच, उपसरपंच थेट पायउतार! 727 ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज'! 'या' अधिकाऱ्यांकडे जबाबदारी

Sarpanch Terms End Administrators : गावगाड्याचे राजकारण सध्या थांबले आहे. पुणे जिल्ह्यातील 27 ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकराज आले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्ह्यातील गावागाडाच्या राजकारणाला सध्या ब्रेक लागला असून, तब्बल ७२७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज आले आहे. जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८९ ग्रामपंचायतींपैकी निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. त्यामुळे गावपातळीवरील राजकीय कारभाराची सूत्रे आता थेट अधिकाऱ्यांच्या हाती गेली आहेत.

ग्रामपंचायत ही गावच्या राजकारणाची पहिली पायरी मानली जाते. त्यामुळे एकाच वेळी ७२७ ग्रामपंचायतींवर लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपणे हा जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणातील मोठा बदल मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक, माजी पदाधिकारी आणि स्थानिक राजकीय गटांची धावपळ सुरू असतानाच प्रशासकांची नियुक्ती झाल्याने गावागावातील राजकीय समीकरणांनाही वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

विस्तार अधिकाऱ्यांकडे गावगाड्याची सूत्रे

ग्रामपंचायतींचा दैनंदिन कारभार ठप्प होऊ नये, विकासकामांना अडथळा येऊ नये आणि प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहावे, यासाठी विस्तार अधिकाऱ्यांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्तीचे अधिकार आहेत.

त्यामुळे ज्या गावांमध्ये कालपर्यंत सरपंच आणि सदस्यांच्या माध्यमातून निर्णय घेतले जात होते, त्या गावांचा कारभार आता प्रशासकीय यंत्रणेकडून पाहिला जाणार आहे. विकासकामे, ग्रामपंचायतीचे दैनंदिन निर्णय, प्रशासकीय प्रक्रिया आणि उपलब्ध निधीचा वापर यावर प्रशासकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सहा महिन्यांचा ‘प्रशासकीय’ कालावधी

प्रशासकांचा कार्यकाळ राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत किंवा संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. यापैकी जे आधी होईल, तोपर्यंत प्रशासकांकडे कारभार राहणार आहे. ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी याबाबत अधिसूचना काढली आहे.

निवडणुकीचे पडघम; इच्छुकांची फिल्डिंग सुरू

दरम्यान, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता निवडणूक कार्यक्रमाकडे गावपातळीवरील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रशासकांकडे कारभार गेल्याने सध्या राजकीय हालचालींना मर्यादा आली असली, तरी आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

विशेष म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीत गावातून थेट सरपंचाची निवड होणार असल्याने सरपंचपदासाठी इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका केवळ ग्रामपंचायतींच्या सत्तेसाठी न राहता अनेक गावांमध्ये स्थानिक राजकीय गटांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत. आता प्रशासकांच्या हाती गावगाडा असला, तरी खरा राजकीय खेळ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच रंगणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT