Eknath Shinde, Ganesh Jambhulkar News Sarkarnama
पुणे

PCMC News : शिदेंचा गुवाहाटी पॅटर्न ग्रामपंचायतीतही 'हिट' ; शिवसेनेच्या सदस्याला कामाख्या देवी पावली

उत्तम कुटे

Pimpri-Chinchwad News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील गेल्या वर्षीचे बंड आणि गुवाहाटीचा (आसाम) दौरा चांगलाच गाजला. कारण त्यानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाली. आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची आली. गुवाहाटीची कामाख्या देवी शिंदेंना पावली. त्यामुळे त्यांचा सत्तेचा हा गुवाहाटी पॅटर्न राज्यात जम धरू पाहत आहे. कारण तो आयटी पार्क हिंजवडीच्या (ता. मुळशी) ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये तो चक्क वापरण्यात आला. त्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली.

२५ तारखेला झालेली हिंजवडी ग्रामपंचायतीची निवडणूक ही त्यातील बहुतांश सदस्यांना आसामला नेण्यात आले म्हणूनच ती गाजली नाही, तर ती निवडणुकीच्या दिवशी थेट पोलिस ठाण्यातच पोचली. सरपंचपदाचे उमेदवार मयूर साखरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार गणेश जांभूळकर यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घ्यायची आहे, असे सांगून तो निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत नाईकवाडी यांच्या हातातून घेतला. फाडून टाकला आणि स्वतःजवळ ठेवला. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून नाईकवाडी यांनी साखरेंविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

त्यात आता त्यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे, असे सीनिअर पीआय डॉ. विवेक मुगळीकर यांनी `सरकारनामा`ला सांगितले. तर, प्रतिस्पर्ध्याचा उमेदवारी अर्ज हातात घेताना फाटला, असा दावा साखरेंनी आज 'सरकारनामा'शी बोलताना केला. दरम्यान, सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे (Shivsena) जांभूळकर हे नऊ विरुद्ध सात मतांनी विजयी झाले. त्यामुळे त्यांनाही एकनाथ शिंदेंप्रमाणे आसामची प्रसिद्ध कामाख्या देवी पावली, अशी चर्चा ऐकायला मिळाली. कारण त्यांच्या गटाचेच सदस्य आसामला गेले होते.

पुणे (Pune) जिल्ह्यात सर्वात मोठी आर्थिक बाबतीत आघाडीवर असणाऱ्या हिंजवडीच्या ग्रामपंचायतमध्ये सदस्य होण्यासाठी मोठी चुरस असते. सरपंचपदासाठी, तर मोठा खर्च केला जातो. आमदारकीच जणूकाही निवडणूक आहे, असे वाटते. त्यात सरपंचपद या वेळी ओपन असल्याने मोठी चुरस होती. त्यातून सरपंचपदाच्या निवडणुकीपूर्वी एका गटाच्या इच्छुकाने काही सदस्यांना कोल्हापूर–कणकवली-मुंबई- गुवाहाटी- कोलकत्ता- मुंबई असे १५ दिवस फिरायला नेले. थेट निवडणुकीच्या दिवशीच त्यांना परत आणले.

त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याप्रमाणे आसामच्या कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यांना ती पावली. कारण त्यांचाच सरपंच झाला. शिंदे आणि त्यांच्याबरोबरचे पन्नासेक आमदार गुवाहाटीतील ज्या रेडिसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलात राहिले, तेथेच हे ग्रामपंचायत सदस्य राहिले, असेही सांगण्यात आले. त्यावर पन्नासेक लाख रुपये खर्ची झाल्याचे समजते. दरम्यान, कामाख्या देवीचे आम्ही दर्शन घेतल्याचे हिंजवडीचे नवनिर्वाचित सरपंच जांभूळकर यांनी आज सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT