पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत (PCMC Election 2022) राष्ट्रवादी कॅाग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लक्ष घातले आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतेच आश्चर्य व्यक्त केले आणि ते सुद्धा जोमाने कामाला लागले. आता या पाठोपाठ आम आदमी पक्षाने (AAP) सुद्धा पिंपरी पालिका निवडणुकीत लक्ष घातले आहे.
गेल्या साडेचार वर्षात पक्षाने संधी तथा पालिकेत पद न दिल्याने भाजपचे नाराज सात नगरसेवक दिल्लीत सत्ता असलेल्या `आप' च्या संपर्कात आहेत. त्यांच्या दोन बैठकासुद्धा आतापर्यंत पुण्यात झाल्या आहेत. त्याला `आप`चे प्रदेश संघटक विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दुजोरा दिला आहे. २०२२ ची पिंपरी-चिंचवडची नाही तर पुणे महापालिकेचीही निवडणूक सुद्धा आपला पक्ष लढणार असल्याचे कुभांर यांनी सांगितले.
दरम्यान, पिंपरी पालिकेतील भाजपच्या नाराज सात नगरसेवक हे पक्षांतर करण्यासाठी थेट दिल्लीत सत्तेत असलेला 'आप' च्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. गेल्या साडेचार वर्षात पक्षाने पद न दिल्याने भाजपचे सात नगरसेवक हे संपर्कात असल्याचे आपचे कुंभार यांनी सांगितल्याने या निवडणुकीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लक्ष घालल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. हा पक्ष गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीत जोरदार लढत देण्याच्या तयारीन उतरत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पुण्यात या पक्षाला चांगली मते मिळतील, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये भावकी-गावकीचे राजकारण जोरात चालते. त्यात `आप` काय बदल घडविणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. येथे राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांची ताकद जास्त आहे. हे नगरसेवक त्यामुळे खरोखरच `आप`पर्याय निवडणार की कात्रजचा घाट आपल्या नेत्यांना दाखविणार, याचीही उत्सुकता आहे.
पुन्हा एक नाराज नगरसेवक पत्रकार परिषद घेऊन करणार आमदारांची पोलखोल..
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्ष सोडलेल्या पिंपरी-चिंचवडमधील चार जणांना पश्चाताप कसा होईल, हे पाहण्यास आम्ही समर्थ आहोत, असा धमकीवजा इशारा शनिवारी (ता.२३ ऑक्टोबर) दिला होता. त्यानंतरही शहर भाजपमधील नाराजी दूर होण्याचे संकेत नाहीत. उलट येत्या दहा दिवसात ती जाहीरपणे पुन्हा समोर येण्याचेच संकेत मिळाले आहेत. भाजपच्या चुकीच्या कारभाराविरोधात पत्रकार परिषदच घेणार असल्याचे भाजपच्या एका नाराज नगरसेवकाने `सरकारनामा`ला सांगितले.
दरम्यान, शहर भाजपमधील १५ ते २० नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे. शहर कारभारी आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap ) यांच्या चिंचवड मतदारसंघातील भाजपला पाठिंबा असलेले पाच अपक्ष नगरसेवकांचे गटनेते कैलास बारणे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर, दुसरी नगरसेविका टर्म संपताच तो करणार आहे. तर, भोसरी महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या मतदारसंघातील तीन नगरसेवकांची नाराजी त्यांनी आमदारांच्या नवरात्रोत्सवाला हजेरी न लावून स्पष्ट केली आहे. त्यातील दोघे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे संकेत त्यांच्या भेटीगाठीतून दिसुन आले आहेत.
या घडामोडी सुरू असतानाच नुकतेच भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आपल्या दोन्ही कारभारी आमदारांवर लेटरबॉम्ब टाकला. त्यांची चुकीची कामे, हस्तक्षेप आणि गैरव्यवहाराचा फटका पक्षाला आगामी पालिका निवडणुकीत बसणार असल्याची तक्रार त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस व अमित शहा यांच्याकडेच केली. त्याची त्यांनी दखल घेतली नाही. मात्र, शनिवारी (ता.25 ऑक्टोबर) शहरात आलेल्या प्रदेशाध्यक्षांनी त्यावर धमकीचा इशारा नाराजांना व त्यातही बंड करू पाहणाऱ्या नगरसेवकांना दिला आहे.
पाटील यांनी इशारा देतानाच दुसरीकडे आपल्या आमदारांचेही कान टोचले. नगरसेवक नीट कसे राहतील हे सांगताना आमदार नीट कसे वागतील हे पाहण्यास आम्ही समर्थ आहोत, असे सांगत त्यांनी आपल्या नगरसेवकांबरोबरच आमदारांनाही सूचक इशारा दिला आहे. मात्र, त्याचा परिणाम नाराज नगरसेवकांवर होईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. कारण दोन्ही आमदारांच्या चुकीच्या कारभाराविरोधात आता पत्रकारपरिषदच घेणार असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.