पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या काही महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी होत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिन्यात दोनवेळा भेट दिल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पिंपरीपाठोपाठ पवार पुण्यातही लक्ष घालणार असल्याचे सांगितले जात असून दिवाळीनंतर पुण्यासाठी ते विशेष वेळ देणार आहेत.आजी-माजी नगरसेवक तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत दिवाळीनंतर पवार यांची विशेष बैठक होणार असल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अजित पवार यांचे वर्चस्व होते. मात्र,गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे या पवार यांच्या खंद्या समर्थकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत भारतीय जनता पार्टीकडून आमदारकी मिळविली.जगताप व लांडगे यांच्या रूपाने मोठी ताकद भारतीय जनता पार्टीच्या मागे उभी राहिल्याने पिंपरीत सत्तांतर झाले. भाजपाला बहुमत मिळाले. अजित पवार यांचे वर्चस्व मोडीत निघाले.मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने अजित पवार पुन्हा आक्रमक झाले असून काहीही करून पिंपरीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.त्यातच स्वत: पवार यांनी पिंपरीला महिन्यात दोनदा भेट दिल्याने कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
पिंपरी बरोबरच पुण्यातही सत्ता परिवर्तन करण्याची अजित पवार यांची मनिषा असून पुण्यातही त्यांनी चांगलाच जोर लावला आहे. पुण्याची संघटना पिंपरीच्या तुलनेत अधिक चांगली आहे. पुणे ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका आहे.त्यामुळे या शहरात स्वबळावर सत्तेत येण्याची कितीही इच्छा असली तरी राज्यातील सत्तेच्या गणितामुळे राष्ट्रवादीला महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
या साऱ्या पाश्र्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा दिवाळीनंतर होणार पुणे दौरा महत्वाचा ठरणार आहे. या दौऱ्यात काहीजणांचा पक्षप्रवेश तसेच सर्व आजी-माजी नगरसेवक आजी-माजी पदाधिकारी व काही प्रमुख कार्यकर्त्यांसोबत पवार यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.दिवाळीनंतर शरद पवार या बैठकीसाठी वेळ देणार असून त्यानंतर पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक उत्साहाने कामाला लागतील असे पक्षाच्यावतीने सांगण्यात येत आहे. पुण्यात राष्ट्रवादीची ताकद महाआघाडीच्या घटक पक्षात सर्वाधिक आहे. परिणामी जागा वाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा राहणार हे निश्चित आहे.आघाडीतील जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळेदेखील पवार यांच्या पुणे दौऱ्याला महत्व आहे.
Edited By: Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.