Pune, 07 February : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरद बुट्टे पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात बुट्टे पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्या हल्ल्याचा थरारक प्रसंग खुद्द बुट्टे पाटील यांनी कथन केला आहे. भामा आसखेडवरून धामणीला जाताना माळरानावर रस्त्यावर दगड ठेवलेले दिसले, ते काढण्यासाठी आम्ही गाडीतून खाली उतरल्यानंतर आमच्यावर दगडफेक झाली. मात्र, पाठीमागून गाड्या आल्याने ती तरुण मुलं फरार झाली, अशी हकिकत बुट्टे पाटील यांनी कथन केली.
शरद बुट्टे पाटील (Sharad Butte Patil) म्हणाले,खेड तालुक्यातील भामा खोऱ्यातील जिल्हा परिषद मतदारसंघातून मी तीनवेळा निवडून आलो. पण यापूर्वी असा कधी प्रकार झालेला नाही. पण, या वेळी आमच्या विरोधातील उमेदवार हे आळंदी शहराजवळचे आहेत. त्यांची संपूर्ण प्रचारयंत्रणा बाहेरून लावली जाते. त्यामुळे बाहेरील गाड्या मोठ्या प्रमाणात गटात फिरत होत्या. प्रचार संपल्यावर त्या गाड्या परत जाणे अपेक्षित होतं, पण त्या गेलेल्या नाहीत. तीन गाड्या अशा आहेत की, त्यांना काळ्या काचा आणि त्यावर नंबरसुद्धा नाहीत. त्या संपूर्ण प्रचारात फिरत होत्या. त्यात बाहेरील तरुण आलेले होते.
माझा एक सहकारी राहुल तरडे हा आजारी असल्याने त्याला भेटायला गेलो होतो. त्यामुळे त्या भागात मी प्रवास करतोय, हे सर्वांना माहिती झालं होतं. भामा आसखेडवरून धामणीला जातानाचा रस्ता हा माळरानाचा असून त्या ठिकाणी अंधार असतो. त्या अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यात मोठंमोठं दगड लावले होते, असे राष्ट्रवादीचे (NCP) नेते बुट्टे पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, आमच्या मनात हल्ला होईल, असं काही आलं नाही, त्यामुळे आम्ही गाडीतून खाली उतरून दगड हटवण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात आमच्यावर दगडफेक सुरू झाली. आम्ही जीव वाचवण्यासाठी म्हणून गाडीत बसू लागलो, तेवढ्यात एक एक दगड आम्हाला लागला. आम्ही तातडीने गाडीत जाऊन बसलो. नेमके त्याचवेळी पाठीमागून गाड्या आल्यामुळे ती तरुण मुलं फरार झाली. ती काही ओळखीची मुलं नव्हती, बाहेरगावावरून आलेली चित्रविचित्र लोकं होती. अंधाराचा फायदा घेऊन हल्लेखोर पळून गेले.
असं कळतंय की, त्या भागातच त्यांचा अड्डा होता, त्यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला आहे. मी कोणावरही आरोप करत नाही. पण आमच्या भागातील परंपरेला छेद देऊन गुन्हेगारी वाढविण्याचे, दहशत माजविण्याचे काम या घटनेतून झाले आहे. या हल्ल्यामुळे मी घाबरलो होतो, ईसीजी नॉर्मल न आल्यामुळे काही काळ हॉस्पिटलला थांबलो. औषधोपचारानंतर मी रात्री घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि कार्यकर्त्यांना शांत केले, असेही शरद बुट्टे पाटील यांनी नमूद केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने माझ्या विरोधात प्रचंड आक्रमक प्रचार केला. तसेच, त्यांच्या काही नेत्यांनी माझ्या ३० ते ३५ कार्यकर्त्यांना फोन करून दम दिला. त्यांच्या फाेनचं रेकॉर्डिंग पाहिलं तर लक्षात येईल. त्यांच्याकडून माझ्या कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेशर टाकलं जात होतं. त्यामुळे त्यांचे पाठीराखे यात असू शकतात, असा आरोप बुट्टे पाटील यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.