Sharad Pawar News : Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News: पक्ष फुटीनंतर पुण्यात गोंधळलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवार भेटणार, बोलणारही

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad News : गेल्या महिन्याच्या दोन तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार गटाने बंड करीत ते राज्यातील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या गटातील कार्यकर्त्यांत काहीसा संभ्रम पसरला आहे.तो दूर करण्यासाठी स्वत शरद पवार हे या महिन्यात शेवटच्या आठवड्यात पुण्यामध्ये त्यांच्याशी मुक्त संवाद साधणार आहेत.

दरम्यान,बंडानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर दावाही ठोकला आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत काहीसे गोंधळाचे वातावरण आहे. अजितदादांनी केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री आणि भाजपचे हेवीवेट नेते अमित शहांच्या पुणे दौऱ्यात त्यांचीच नाही,तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्यामुळे भविष्यात पक्ष भाजपमध्ये,तर सामील होणार नाही ना अशी चर्चा त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत सुरु झाली आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर जसा दोन्ही शिवसेना गटांनी शिवसेना पक्ष आणि पक्षाचे धनुष्यबाण चिन्हावर दावा केला,तसेच राष्ट्रवादीबाबतही घडले आहे. त्यामुळे खरा गट कोणता हा कायदेशीर पेच उभा राहणार आहे..त्यातून दोन्ही गटांचे पदाधिकारी नाही, पण कार्यकर्ते,मात्र संभ्रमावस्थेत आहेत.त्यांना आपला पक्ष नेमका कुठला अशा अनेक शंका सतावत आहेत.त्याचे नेमके उत्तर शरद पवार पुण्यातील सभेतून देणार आहेत.

बालगंधर्व रंगमंदिरात पवारसाहेबांची ही संवाद सभा होईल,असे शरद पवार राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज `सरकारनामा`ला सांगितले. राज्यातील राजकीय उलथापालथीवर ते बोलतील.तसेच आपला पक्ष भाजपमध्ये कधीही सहभागी होणार नाही,हे ही ते यावेळी स्पष्टपणे सांगतील,असे जगताप म्हणाले. सभेची तारीख,मात्र अद्याप फायनल झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT