Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

NCP Reunion: एकत्र येण्याच्या चर्चेचा दोन्ही ‘राष्ट्रवादीं’ना फायदा?

Sharad Pawar and Ajit Pawar News update: सातत्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत. दोघांमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी संवादही होत असतात. त्यामुळे या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. त्याविषयी...

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Political News: गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनीच सुरू केली. मात्र, याच वेळी याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर अजित पवार यांच्या गटात मात्र मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अजित पवार यांना स्वतः याचा खुलासा करावा लागला. असे काही होणार नाही किंवा तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सांगून त्यांनी वेळ मारून नेली. मात्र, त्यानंतरही पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. सातत्याने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत आहेत. दोघांमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी संवादही होत असतात. त्यामुळे या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.

आज पुन्हा भेट

नुकतेच पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार एका कार्यक्रमासाठी एकत्र आले. त्यानंतर पुन्हा येत्या ९ जूनला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारच्या भेटी नाकारणे शक्य नसते. मात्र तरीही या चर्चा पुन्हा सुरू होतच आहेत.

शरद पवार अन् अजित पवार ९ जूनला पुन्हा एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची एक बैठक येत्या ९ जूनला होणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यातून सर्व साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’चे अनेक नेतेही साखर कारखान्याचे प्रतिनिधी आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

बंद खोलीत चर्चेचे निमित्त

वास्तविक साखरेच्या उत्पादनात ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या (एआय) तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल, याबाबतची प्रात्यक्षिकेही यावेळी होणार आहेत. यावेळी या क्षेत्रातील पथदर्शी प्रकल्पाबाबत साखर कारखान्याच्या संचालकांना माहिती दिली जाणार आहे. साखर संकुलात झालेल्या बैठकीतसुद्धा कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रातील वापर आणि त्याचा शेतकऱ्यांना होणार फायदा याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीला अजित पवार, शरद पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. या बैठकीनंतर या नेत्यांची पुन्हा एका खोलीत चर्चा झाली. इथूनच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली.

‘स्थानिक स्वराज्य’साठी फायदा होणार?

मुळात कोणताही नेता जाहीर कार्यक्रमात अशा प्रकारे एकत्र येण्यासंबंधीची राजकीय चर्चा करणार नाही. त्यातच शरद पवार यांनी एकत्रीकरणाबाबतचा निर्णय तरूण नेतृत्व घेईल असे स्पष्ट केलेले असतानाही पुन्हा त्याच त्याच चर्चा का होत आहेत. हा खरा प्रश्न आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावे यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जाणारा आहे.

त्यामुळे या निवडणुकांआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यास दोन्ही गटांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या गटातील अनेक नेते पक्ष सोडून अजित पवार याच्या गटात जात आहेत.

नुकतेच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल जगताप व श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह शरद पवार यांचा गट सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. अशाच प्रकारे भविष्यातसुद्धा नेते शरद पवार गटाकडून निवडणुका लढविल्यानंतर अपयश पदरी आल्यामुळे आता अजित पवार गटाकडे जाण्याच्या मनस्थितीत आहेत.

सौदेबाजीसाठी फायद्याचे

विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले. पण शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी ही ‘आयाराम-गयाराम’ करणाऱ्यांच्या कृतीला आळा बसावा यासाठी अशा प्रकारच्या चर्चा जाणीवपूर्वक उडविल्या जात असल्याची शक्यता आहे.

दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यातच या चर्चा सुरूच राहिल्या तर अजित पवार यांच्या गटाची निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटपातील सौदेबाजीची ताकद वाढू शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चा दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर असल्याने त्या अशाच सुरू राहतील. दोन्ही गटांकडून याचा इन्कार केला जाईल. परंतु या चर्चेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत हवा मिळत राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT