Sharad Pawar-Poonawala sarkarnama
पुणे

पवार- पूनावाला असाही योगायोग : एकाच बॅचच्या दोन काॅलेजमित्रांना पद्मपुरस्कार

केंद्र सरकारडून पद्म पुरस्कारांची घोषणा. पुण्यातील तिघांच्या नावाचा समावेश

Yogesh Kute

पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पद्म पुरस्कारांच्या यादीत पुण्यातील प्रभा अत्रे (Prabha Atre) (पद्मविभूषण), सायरस पूनावाला (Dr Cyrus Poonawalla) (पद्मभूषण) आणि डाॅ. बालाजी तांबे (Dr. Balaji Tambe) (मरणोत्तर पद्मश्री) या तिघांचा समावेश आहे. पूनावाला हे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे काॅलेजपासून मित्र. त्यांची ही मैत्री आजही टिकलेली आहे. पूनावाला यांना पुरस्कार मिळाल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली.

पुण्यातील `बीएमसीसी`मधील (बृहन महाराष्ट्र काॅलेज ऑफ काॅमर्स) एकाच बॅचच्या दोन मित्रांना पद्म पुरस्कार मिळण्याचा दुर्मिळ योगायोग आजच्या घोषणेमुळे जुळून आला. शरद पवार यांनाही त्यांच्या सार्वजनिक कामाबद्दल 2017 मध्ये पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आले होते.

शरद पवार आणि सायरस पूनावाला हे `बीएमसीसी`मध्ये काॅमर्स शाखेत 1958 ते 1962 कालावधीत एकत्र होते. तेव्हा जुळलेले त्यांचे मैत्रीचे बंध आजही कायम आहेत. शरद पवार यांना त्यांचे सर्व मित्र हे पवार साहेब, म्हणून हाक मारतात. पण शरद पवार यांना एकेरी नावाने म्हणजे शरद म्हणून हाक मारणारे सायरस पूनावाला हे एकमेव. इतकी त्या दोघांची मैत्री घट्ट आहे.

याबाबत आठवण सांगताना त्यांचे तिसरे वर्गमित्र विठ्ठलशेठ मणियार म्हणाले की आम्हा सर्व मित्र परिवारासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. आमच्यासोबत राहणारे मित्र आज सर्वोच्च पातळीवर गेले आहेत, याचा अभिमान वाटतो. शरद पवार, पूनावाला असे सारे आम्ही 1958 ते 62 या कालावधीत बीएमसीसीत होतो. पूनावाला हे बिशप शाळेत इंग्रजी माध्यमात शिकलेले. आम्ही मराठी माध्यमांमधून शिकलेलो. पूनावाला हे `ए` तुकडीत तर आम्ही `बी` तुकडीत होती. वर्ग प्रतिनिधी निवडण्यासाठी झालेल्या निवडणुकीत मी आणि सायरस हे शरद पवारांच्या विरोधात निवडणूक लढलो. मी आणि सायरस दोघेही हरलो. हरल्यानंतर पवार यांनी आम्हाला विद्यार्थीहितासाठी एकत्र येऊ असे सांगितले. त्यानंतर आमचा मैत्रीचा मळा बहरला. वर्गात आम्ही फार हुशार नव्हतो. पण सार्वजनिक कामात आम्ही आघाडीवर असायतो. आमच्या गप्पाटप्पा रंगायच्या. आज आम्ही वयाने इतके मोठे झाले असलो तरी मैत्रीचा ओलावा आणि ती ओढ कायम आहे. आमच्या वर्गातील दोन मित्रांना असा मोठा बहुमान मिळणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.

पूनावाला यांच्या वडिलांचा फर्निचरचा व्यवसाय होता. काॅलेज सोडल्यानंतर सायरस यांनी लस उत्पादन सुरू केले. सायरस पूनावाला हे श्रीमंत झाले. पण आजही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. सायरस यांना जगभरातील अनेक विद्यापीठांनी, संस्थांनी गौरवलेले आहे. पण काॅलेजच्या एकाच बॅचमधील दोघांनाही पद्मपुरस्कार मिळणे ही दुर्मिळ बाब असावी. पूनावाला यांना दोन वर्षांपूर्वी पुण्यभूषण पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार मी शरद पवार यांच्याच हस्ते स्वीकारेन, अशी अटच त्यांनी त्यासाठी घातली होती. त्या पुरस्कार सोहळ्यात दोघांनीही एकमेकांना कोपरखळ्या मारल्या होत्या. पण मित्र म्हटल्यानंतर अशा गमतीजमती होणारच. त्यातच खरा आनंद आहे, अशा शब्दांत मणियार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 मध्ये सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना केली. पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो होता. त्यातूनच पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला. लस बनवणारी सीरम ही जगातील सगळ्यात मोठी कंपनी आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटिस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जात आहे. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲअॅस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार केला आहे. कोरोना नियंत्रणात सीरमच्या लशीचा मोठा वाटा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT